राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटीच्या कामगारांनी आंदोलन केल्याची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय असून या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भूमिका मांडली.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करायला हवा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, मागील कित्येक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मात्र एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्याने त्यांचा उद्रेक झाला असून त्यातून हा हल्ला झाला आहे. पण अशा प्रकारचा हल्ला करणे योग्य नसून ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांच्या घरी हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे सरकारच या हल्ल्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, हल्लेखोर एसटी कामगारांना कामावर घेणार नाही, अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी मांडली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कामगारांना कामावर न घेण्याची भूमिका देखील चुकीची आहे.

तर, जेएनयू विद्यापीठात झालेल्या घटनेबाबत विचारले असता आठवले म्हणाले की, “देशातील सर्वात महत्वाचे जेएनयू विद्यापीठ असून तिथे अनेकदा वादाचे प्रकार घडले आहेत. कालची घटना लक्षात घेता, विचाराधारा वेगळी असली तरी देखील प्रत्येकाला काम आपले काम करण्याचा अधिकार आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाले, अशा घटना होता कामा नये. या घटनेची चौकसी करून कारवाई झाली पाहिजे.” अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्धव ठाकरे यांना भाजपाबरोबर यावं, अजून ही वेळ गेली नाही –

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीच जाऊ दिले नसते. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर यावे, त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही.” असे सांगत उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत येण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.