शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर पुण्यात दोन्ही पक्षांची वाताहत झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही नगरसेवक महापालिका निवडणुकीत निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे या शिवसेनेच्या ‘वाघा’ची डरकाळी पुणेकरांच्या कानावर पडली नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एका का होईना नगरसेवकाने विजयी पताका लावल्याने या शिवसेनेची ‘मशाल’ तेवत राहिली. आता ठाकरे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेतील भाकरी फिरवली असून, नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. २०२९ पर्यंत कोणतीही निवडणूक नसली, तरी या कालावधीत शिवसेनेची मशाल तेवत राहणार, की जोमाने पेटणार, याकडे लक्ष असणार आहे.
ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सध्या मोजकेच शिलेदार राहिले आहेत. या शिलेदारांच्या जोरावर महापालिका निवडणूक लढण्याचा या शिवसेनेने प्रयत्न केला. एक नगरसेवक निवडून आल्याने या पक्षाची आब राखली गेली. शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांची फळी आजही पुण्यात आहे. केवळ एका ‘आदेशा’ने जिवाची बाजी लावणाऱ्या या कार्यकर्त्यांकडे पक्षश्रेष्ठी किंवा वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस या पक्षाची वाताहत होत गेली. निवडणुकांमध्ये कोणतीही ठोस भूमिका न घेणे, सातत्याचा अभाव यामुळे कट्टर कार्यकर्ते विखुरले गेले. त्यातल्या काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली, तर काहींनी चलती असलेल्या भाजपची.
पुणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यांपैकी अविनाश साळवे हे काँग्रेसमध्ये गेले. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले हे माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले. श्वेता चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात, तर प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे हे शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेले. कार्यकर्त्यांची जेमतेम फळी शिल्लक राहिली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नितीन गावडे हे एकमेव नगरसेवक निवडून आले.
आता या शिवसेनेला पूर्वपदावर आणण्यासाठी पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय – उशिरा का होईना – घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील शहरप्रमुख आणि अन्य महत्त्वाच्या पदांची जबाबदारी ही आता नवीन पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहरप्रमुखपदी वसंत मोरे आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरासाठी शहर समन्वयक म्हणून नगरसेवक नितीन गावडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. संजय मोरे आणि गजानन थरकुडे हे दोघे शहराध्यक्ष होते. त्यांच्या जबाबदारीमध्ये वाढ करून त्यांना सहसंपर्कप्रमुखपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. त्यानुसार संजय मोरे यांच्याकडे पुरंदर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ, तर गजानन थरकुडे यांच्याकडे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे पिंपरी-चिंचवड शहराचे सहसंपर्कप्रमुख असणार आहेत.
पुणे जिल्ह्यासाठीही आता काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार रामदास धनवटे यांना जिल्हाप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. सहसंपर्कप्रमुख पदावर नेमलेल्या सुरेश भोर यांच्याकडे खेड, आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. दिलीप बाम्हणे यांच्याकडे जुन्नर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघ, तर केसरीनाथ पाटील यांच्याकडे चिंचवड आणि भोसरी विधानसभासंघ देण्यात आले आहेत. जुन्नर विधानसभा प्रमुखपदी आनंद रासकर आणि जुन्नर तालुकाप्रमुखपदी भास्कर घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. हे नवीन शिलेदार हे आता पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
पुण्यात १९९५ मध्ये एकाच वेळी तीन आमदार आणि २००७ मध्ये पुणे महापालिकेत २० नगरसेवक एवढी ताकद असणारी तत्कालीन शिवसेना दुभंगल्यावर दोन्ही पक्ष निष्प्रभ झाले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मान्य केली आहे. पुण्याकडे लक्ष देईन, असे आश्वासन त्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी दिले. मात्र, त्यानंतरही संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षबळकटीसाठी फारसे प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे एकेक शिलेदार सोडून गेले. आता नव्याने पक्षांची बांधणी करण्यासाठी शहरप्रमुख आणि जिल्हाप्रमुख बदलण्यात आले आहेत.
प्रखर भूमिका आणि आक्रमकता हा मूळ स्वभाव असणाऱ्या शिवसेनेची ‘मशाल’ पणतीप्रमाणे तेवणार की, धगधगत्या अंगाराप्रमाणे पेटणार, हे नवे शिलेदार आगामी काळात दाखवून देणार आहेत. सध्या तरी शिवसेनेचा ‘आव्वाज’ मंदावला आहे. तो पुणेकरांच्या कानी घुमणार का, हाच खरा प्रश्न आहे.
sujit.tambade@expressindia.com
