“उद्धव ठाकरेंना पंतप्रधान सुद्धा केलं पाहिजे”; पृथ्वीराज चव्हाण यांचं पत्रकारपरिषदेत विधान!

पंतप्रधान मोदींवर केली आहे टीका तसेच नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबतही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले

Prithviraj Chavan
मोदींच्या व त्यांच्या टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेलेत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान सुद्धा केलं पाहिजे, एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. शेवटी असं आहे की लोकाभिमूख प्रशासन देणं हे शक्य आहे. ते लोकांना केंद्रभागी ठेवून करता येतं.” असं विधान आज (रविवार) पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? हे समजायला हवं –

तसेच, “यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केली, मोदींची केवळ प्रसिद्धी आहे. अगदी लसीकरणाबाबत बोलायचं झालं तर, चार दिवस लसीकरण थांबवायचं आणि पाचव्या दिवशी रेकॉर्ड झाला म्हणून पाठ थोपटवून घ्यायची. यामुळे किती लोकांचे जीव चाललेत. मोदींच्या व त्यांच्या टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेलेत, याचा मला वाटतं कधीच निश्चित आकडा आपल्याला कळणार नाही. आज चार लाखांपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? हे समजायला हवं.” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवलं.

नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रीपदावर म्हणाले….-

तर, नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबाबत बोलतान पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “नारायण राणे मंत्री झाले त्याचं अभिनंदन. ते माझे सहकारी होते. कुणाला मंत्री म्हणून घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही. कुणाला कुचकामी ठरवायचं, अकार्यक्षम ठरवायचं हा मोदींचा अधिकार आहे. काही जणांना कार्यक्षम ठरवलं आहे, काही जणांना हकलून दिलं आहे, हा त्यांचा अधिकार आहे मी त्यावर कसं बोलणार. कुठलाही पंतप्रधान हा देशाला चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करत असतो, आता मोदींचा आकलनानुसार ते १२ मंत्री अपयशी ठरले. कार्यक्षम नव्हते म्हणून त्याच्या जागी त्यांनी काही नवीन माणसं घेतली आहेत आणखी काही येतील माणसं. आता ते कसं काम करतात आपण पाहूयात.”

चौकशी समितीचा फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी उपयोग होत आहे –

“एखाद्याच्या अंगावर कुत्रा सोडल्या सारखे सुरू आहे. अंतिम निर्णय कुठंच नाही. अशा पद्धतीने आज केंद्राकडून ईडीच्या चौकशी सुरू आहे. एखाद्याकडून गुन्हा घडला असल्यास, त्या गुन्हेगाराला न्याय प्रक्रिया झाल्यानंतर शिक्षा व्हायला पाहिजे. पण आज हे कुठे ही होताना दिसत नाही. तसेच अनेक जणांना तुरुंगात टाकलं जात असून, काहींवर धाडी टाकण्यात येत आहे. पण शेवटी काहीही होताना दिसत नाही. ज्यांनी पक्ष बदलला त्यांच्या चौकशा होत असून चौकशी समितीचा फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी उपयोग होत आहे.” असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत –

महाविकासआघाडी सरकार मार्फत पेट्रोल-डिझेलवर अधिकचा कर आकारला जात आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जसे ओबीसी आरक्षणाबाबत खोटे बोलले, तसेच ते पेट्रोल डिझेलच्या राज्यातील करा बाबत बोलले आहेत. राज्यात भाजपाची सत्ता असताना पेट्रोल डिझेलवर जो व्हॅट आकाराला गेला. तोच दर सध्या आकारला जात आहे. त्यामध्ये वाढ करण्यात आली नाही. जर केंद्राकडून कर कमी केला तर राज्य सरकार देखील कर कमी करण्यास पुढे येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uddhav thackeray should also be made the prime minister prithviraj chavan msr 87 svk

ताज्या बातम्या