बाळासाहेब व पवारांनी सांभाळलेल्या संबंधांचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा – अजित पवार

शरद पवार यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पवार व बाळासाहेबांनी शेवटपर्यंत सांभाळलेल्या मित्रत्वाच्या संबंधाचा विचार करावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पवार व बाळासाहेबांनी शेवटपर्यंत सांभाळलेल्या मित्रत्वाच्या संबंधाचा विचार करावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली होती. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यांनी काय विधाने करावीत, हा त्यांचा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की अशी विधाने केली जातात. मात्र उद्धव ठाकरे यांचे वडील व पवारांचे संबंध कसे होते, याचा विचार त्यांनी करावा. त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध होते व त्यांनी ते शेवटपर्यंत सांभाळले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ.
 ‘तक्रारीतील तथ्य मुख्यमंत्री तपासतील’
सहकारी साखर कारखाने विक्रीत घोटाळे झाल्याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत तथ्य आहे की नाही हे मुख्यमंत्री तपासतील, असे अजित पवार म्हणाले. सहकारी बँकांनी कारखान्यांना कर्जे दिली होती. चुकीचे व्यवस्थापन व काही ठिकाणी ऊसच नसल्याने कर्जे थकली. काही कारखाने जिल्हा बँकेने, काही राज्य बँकेने, तर काही राज्य शासनाने विकले. हे कारखाने नियमाने विकले का किंवा त्यात काही चुकीचे घडले का, हे पाहिले पाहिजे. चुकीचे काम झाले असेल तर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

 ‘बारामती प्रकरणी सखोल चौकशी’
बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर एका निलंबित महिला फौजदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल असल्याप्रकरणी अजित पवार म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. ही चौकशी होईलच, मात्र या प्रकरणात दुसरी बाजूही पाहिली पाहिजे. संबंधित नगरसेवकाशी मीही बोललो आहे. घटनेच्या दिवशी ते घरीच होते. संबंधित महिला फौजदाराला काही दिवसांपूर्वी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uddhav thackray should think over the friendly relationship of balasaheb and sharad pawar

ताज्या बातम्या