पुणे : दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली. या निर्णयामुळे नोकरदार किंवा नियमित महाविद्यालयात जाऊ न शकणारे विद्यार्थी, महिलांना कमी कालावधीत, सहजपणे पदव्युत्तर पदवी पूर्ण करता येणार आहे.
‘यूजीसी’च्या सचिव प्रा. श्यामा रथ यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणात उच्च शिक्षणाची रचना काही प्रमाणात बदलण्यात आली आहे. त्यानुसार, पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्यात आला आहे. मल्टिपल एंट्री-मल्टिपल एक्झिट धोरणानुसार विद्यार्थ्यांना एका वर्षानंतर प्रमाणपत्र, दोन वर्षांनंतर पदविका, तीन वर्षांनंतर पदवी, चार वर्षांनतर ऑनर्स किंवा संशोधनासह ऑनर्स पदवी मिळणार आहे. तसेच, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एका वर्षाचा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नियमित पदव्युत्तर अभ्यासक्रमासह ऑनलाइन आणि दूरस्थ पद्धतीनेही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
‘यूजीसी’च्या निर्णयानुसार, चार वर्षांचा ‘ऑनर्स’ पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी एका वर्षाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत. मात्र, ही सुविधा सर्वच उच्च शिक्षण संस्थांना थेट उपलब्ध होणार नाही. आधीपासूनच दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम दूरस्थ किंवा ऑनलाइन पद्धतीने चालविण्यास मान्यता असलेल्या संस्थांना त्याच विषयात एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविता येणार आहे.
एमबीए, एमसीए आणि पीजीडीएम अशा व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता ही संबंधित नियामक संस्थांनी वेळोवेळी निश्चित केलेल्या निकषांनुसारच राहील. तसेच, या अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासक्रम साहित्य, मूल्यमापन प्रणाली आणि श्रेयांक आराखडा ‘यूजीसी’च्या नियमांनुसार असणे बंधनकारक आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थेच्या विद्या परिषद, अभ्यास मंडळाची मंजुरी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना देशात-परदेशात नोकरी मिळाल्यास नोकरी करतानाही ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येणार आहे.
सध्या स्वायत्त महाविद्यालयात चौथे वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी २०२७-२८मध्ये एक वर्षाचा ऑनलाइन, दूरस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करता येईल. – डॉ. वैभव जाधव, संचालक, दूरस्थ आणि ऑनलाइन प्रशाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
