पुणे : विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (यूजीसी नेट) परीक्षेचे वेळापत्रक तारखा जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ८, ९, ११ आणि १२ जुलै, तसेच १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) नेट परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहे. एनटीएमार्फत वर्षातून दोन वेळा यूजीसी नेटचे आयोजन जाते. मात्र, करोनामुळे डिसेंबर २०२१ या सत्राची परीक्षा होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे जून २०२२ मध्येही या परीक्षा प्रस्तावित होती. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्याचे यूजीसीने जाहीर केले होते. त्यानुसार जुलै आणि ऑगस्टमध्य़े होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.