पुणे : उजनी धरण परिसरात ‘सीड’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्रस्तावित ‘एआय डेटा सेंटर’, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर या प्रकल्पांमुळे पाण्याचा आणि वीजेचा बेसुमार वापर होणार असून, तापमानवाढ, ध्वनिप्रदूषण, नैसर्गिक अधिवासावर दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विरोध असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहीत पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली.

महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार नगरे यावेळी उपस्थित होते. यासंदर्भातील सादरीकरण रोहीत पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. ‘सेमीकंडक्टर’सारखे मोठे रोजगार निर्मिती प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात असून, महाराष्ट्राला पाण्याचा बेसुमार वापर करणारे, प्रदूषण करणारे डेटा सेंटरसारखे विनाशकारी प्रकल्प दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले, ‘उजनी धरणाच्या परिसरात सीड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकार, जेएसडब्लू ग्लोबल आणि द सीड कॉर्सोटिअम पार्टनर्स यांच्यामध्ये १ लाख ६५ हजार १५४ कोटींच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला आहे. त्यामध्ये धरणाच्या सौरऊर्जा, ‘एआय’ डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर हे चार मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जलसंपदा विभागाची शेकडो एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. विकासाच्या नावाखालील हे प्रकल्प राज्यासाठी विनाशकारी ठरणार आहेत.’

येत्या शनिवारी हिंगणगाव येथे त्याविरोधात होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. ते म्हणाले, ‘उजनी धरणावर दोन लाख हेक्टर शेतीक्षेत्र, पिण्यासाठी पाणी, मत्स्यव्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र, एआय डेटा सेंटरचे तापमान नियंत्रित करण्यासाठी किमान नऊ टीएमसी (अब्ज घन फूट) पाणी लागणार असून, परिणामी पुढील वीस वर्षांत पिण्यासाठी देखील पाणी उरणार नाही. तरंगत्या सौर प्रकल्पातील पॅनेलमुळे पाण्याचे तापमान वाढून मासे आणि जलचरांचा अधिवास धोक्यात येईल. अणुऊर्जा निर्मितीसाठी प्रस्तावित स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरमध्ये दुर्घटना घडल्यास किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होऊन उजनी धरणाची भिंत फुटल्यास सोलापूर पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार असून, त्यासाठीच कर्जत-भीमाशंकर येथे वृक्षतोड करून पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला.