इंदापूर : उजनी धरणाच्या पाणथळ किनाऱ्यांवर दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणारे रोहित पक्षी ( फ्लेमिंगो) यंदा अद्याप दिसलेले नाहीत. उजनी जलाशयावर ऑक्टोबरअखेरपर्यंत या स्थलांतरित पाहुण्यांचे थवे उतरतात; पण यंदा उजनीकाठ शांत आहे. पाणथळ किनाऱ्यांवर त्यांच्या गुलाबी छटा अद्याप उमटलेल्या नसून यावर्षी त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे.
यावर्षी उजनी धरण काटोकाठ भरले आहे. रोहित पक्ष्यांना प्रिय असलेले उथळ पाण्याचा किनारी भाग अन्नासाठी, सूक्ष्म जलचर आणि शैवालांसाठी अत्यावश्यक असतो. तो भाग पाण्याखाली आहे. रोहितांना उथळ, पाणथळ, दलदलीसारख्या ठिकाणी अन्न मिळते. मात्र, या वर्षी उजनीचा नैसर्गिक चराऊ प्रदेश पाण्याखाली गेल्याने या पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे.
गेल्या चार दशकांपासून उजनीवरील स्थलांतरित रोहित पक्ष्यांचे आगमन हे ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात सुरू होते. उजनी जलाशयाचे उथळ भाग विशेषतः कुंभारगाव, डाळज, पळसदेव, भिगवण, काळेवाडी परिसर हे त्यांच्या मुक्कामाचे केंद्र असते. यंदा खाद्य मिळवण्यासाठी आवश्यक उथळ भाग उपलब्ध नसल्याने त्यांनी उजनीकडे पाठ फिरवली आहे.
रोहित पक्षी हे जगभरातल्या सर्वात आकर्षक स्थलांतरित पक्ष्यांपैकी एक आहेत. युरोपियन देशात बर्फ पडू लागले की, गुजरातमधील कच्छचे रण आणि उजनी धरण ही त्यांची आवडती आश्रयस्थाने आहेत. हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. येथे त्यांना सुरक्षित वातावरण, खाद्य मिळते. मात्र, हवामान बदलामुळे त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. तसेच उजनी जलाशयावर दिसणाऱ्या जलपक्ष्यांची संख्याही यंदा लक्षणीयरीत्या घटलेली आहे.
हवामान बदलामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होत आहेत. सततचा पाऊस आणि जलाशयातील उच्च पातळी यामुळे उथळ पाणथळ भाग नष्ट झाले आहेत. रोहितांना त्यांच्या खाद्यसाखळीसाठी आवश्यक असलेले वातावरण सध्या उजनीत नाही. त्यामुळे त्यांचे आगमन उशिरा होईल. पर्यावरणातील हा बदल चिंताजनक आहे. – डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण तज्ज्ञ
