इंदापूर : उजनी धरण परिसरात पावसाने ओढ दिल्याने अद्यापही या धरणाचे पात्र कोरडे आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ४८.४९ अब्ज घन फूट (टीएमसी) असून, उपयुक्त पाणीसाठा उणे १४.३१ टीएमसी आहे. धरणात पाणीसाठा कमी असला, तरी आषाढी वारीसाठी दीड ते पावणेदोन टीएमसी पाणी नदीपात्रातून सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या धरणातील पाणीसाठा आजच्या दिवशी १०१.१८ टीएमसी होता. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ३७.५२ टीएमसी होता. यंदा पावसाने ओढ दिली असल्याने मृतसाठ्याचा वापर करण्यात येत आहे. सध्या धरणात ४८.७४ टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा हा उणे २७.८५ टीएमसी झाला आहे. धरणाचा सांडवा, वीजगृह, कालवा, बोगदा; तसेच सीना-माढा आणि दहीगाव उपसा सिंचन योजनांमधून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.
बाष्पीभवनामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यात आणखी घट होत आहे. याबाबत उजनी धरणाच्या कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे म्हणाल्या, ‘धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. मात्र, आषाढी वारीसाठी दीड ते पावणेदोन टीएमसी पाणी नदीपात्रातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १७ आणि १८ जुलै रोजी पाणी सोडण्यात येणार आहे.’
