पुणे : निवडणूक आयोगावर काँग्रेसच्या सत्ताकाळापासून पंतप्रधानांचा दबाव राहिलेला असून, मोदी सरकारच्या काळात तो पराकोटीला पोहोचला आहे,’ असे स्पष्ट मत राज्यघटनेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी बुधवारी व्यक्त केले. कायद्यात दुरुस्ती न करता ‘फॉर्म सहा’मध्ये बदल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला असून, या प्रकरणी दाखल याचिकेचा निकाल लागेपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तात्पुरते निलंबित करता येईल का, याबाबत विचार झाला पाहिजे,’ असेही बापट यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने ‘निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल न करण्याचे संरक्षण योग्य आहे का?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बापट बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यावेळी उपस्थित होते. बापट म्हणआले, ‘मुक्त आणि पारदर्शक निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा असून, राज्यघटनेच्या मूळ संरचनेचा अविभाज्य भाग आहे. निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगालाही त्याविरोधात कृती करण्याचा अधिकार नाही.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आपली वाटचाल संसदीय लोकशाहीकडून पंतप्रधानशाहीकडे सुरू आहे. फक्त इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली. मात्र, मोदी आणीबाणी घोषित न करता त्याप्रमाणे कारभार करत आहेत.
‘निवडणूक आयोगाला कलम ३२४ अंतर्गत मतदारयाद्या तयार करण्याचा अधिकार असला, तरी कायदा करण्याचा अधिकार संसदेला असून, त्याविरोधात कोणतीही कृती करता येणार नाही.

त्यामुळे या कायद्यानुसार ‘फॉर्म सहा’मध्ये एकतर्फी बदल करण्याचा अधिकार आयोगाला आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला आहे. अशा घटनात्मक खटल्यांमध्ये सहा महिन्यांत निकाल लागला पाहिजे. मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवून काढण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून, या खटल्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना निलंबित करण्याबाबत विचार झाला पाहिजे, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने ‘फॉर्म सहा’मध्ये बदल केला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही मतदार याद्यांमध्ये गडबड केली आहे,’ असा आरोप ॲड. असीम सरोदे यांनी केला. उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. संजय बालगुडे यांनी प्रास्ताविक केले.

एकनाथ शिंदे पहिल्या दिवसांपासून घटनाबाह्य मुख्यमंत्री

‘शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसांपासून घटनाबाह्य मुख्यमंत्री होते; कारण एकाच वेळी दोन तृतीयांश आमदारांचे कुठल्याही पक्षात विलीनीकरण झाले नव्हते, ही बाबही उल्हास बापट यांनी निदर्शनास आणून दिली.