पुणे : ‘वेगवेगळ्या विषयांमध्ये अभ्यास, संशोधन करून अनेकजण व्यासंगातून घडतात. पण, घरातील वारकरी संप्रदायाचे आणि सेवादलाचे संस्कार, बाळासाहेब भारदे, यशवंतराव चव्हाण यांच्यासह साहित्यिक-कलाकारांचा सहवास अशा सत्संगातून मी घडलो,’ अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी रविवारी व्यक्त केली. ‘राजकारणी सर्वज्ञ नसला तरी तो सर्वस्पर्शी असावा हे यशवंतरावांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला,’ असेही त्यांनी सांगितले.
विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने वयाची ८१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल उल्हास पवार यांचा राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पवार बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, आनंद माडगूळकर, कृष्णकुमार गोयल, सनदी लेखापाल सारिका जोगळेकर आणि ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.
पवार म्हणाले, ‘लहानपपणापासूनच श्रवणभक्तीचा भोक्ता असल्याने सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांना पुढच्या रांगेत बसून मी अनेक दिग्गजांची भाषणे ऐकली. समोरच्या व्यक्तीच्या मुद्द्यांचे खंडन करताना हा गुण मला माझ्या पुढच्या राजकीय कारकिर्दीत उपयुक्त ठरला. यशवंतराव चव्हाण यांच्या सभेनंतर वंदे मातरम म्हणणारा कार्यकर्ता अशी माझी ओळख होती. सत्ता मिळाली तर आनंद वाटतो. पण, नाही मिळाले तरी काही बिघडत नाही. नाव उल्हास आहे म्हटल्यावर हसलेच पाहिजे.’
‘आधीच उल्हास त्यात श्रावणमास’ अशी मिश्कील टिप्पणी करून मोरे यांनी ‘काँग्रेसच्या सुवर्णकाळाचा उल्हास पवार हा शेवटचा मालुसरा आहे,’ अशा शब्दांत गौरव केला. राजकारणाच्या वादळात ज्योत तेवत ठेवण्याचे काम त्यांनी केले. एकेकाळी कार्यकर्त्यांची शिबिरे होत असत. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर आधी काँग्रेसचा ऱ्हास कसा झाला यावर पुस्तक लिहायला हवे. सत्ता पदाने मिळत नाही. दरारा असला तरी आदर मिळतोच असे नाही. राजकारणात एवढी वर्षे योगदान देऊनही आणि हवे ते पद न मिळूनही त्यांनी त्यांची पत, सत्ता आणि आदार हा त्यांच्या कर्तृत्वावरच मिळवला आहे.
फुटाणे म्हणाले, ‘पंढरपूरच्या विठोबापासून नारायणगावच्या विठाबाईपर्यंत म्हणजेच टाळ आणि चाळ या विषयांवर अधिकारवाणीने बोलणारे असा पवार यांचा लौकिक आहे. संजय गांधी याचे निधन झाले नसते तर उल्हास पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. राजकारण्यांपेक्षा बाहेरचा समाज किती प्रामाणिक यावर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. राजकीय सुडाचा प्रवास सुरू असताना उल्हास पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आपल्याला प्रसन्न करते.’आनंद माडगूळकर म्हणाले, ‘चांगुलपणा हेच उल्हास पवार यांचे भांडवल आहे. वारा येईल तसे पाठ फिरवणारे अनेक राजकारणी आहेत. पण, पवारांची निष्ठा काँग्रेसपासून ढळली नाही.’
