पुणे : ‘सध्या संसदीय कामकाजाला शिस्त, सुव्यवस्था राहिलेली नाही. अशी कोणतीही शिवी राहिली नाही, ती विधीमंडळाच्या-संसदेच्या कामकाजातून काढावी लागली नाही. आता तर ती कामकाजातून काढण्याचीही तसदी घेतली जात नाही. संसदीय कामकाजाने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. आपण कशी माणसं निवडून पाठवली, याची लाज वाटली पाहिजे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी संताप व्यक्त केला. जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच अशा प्रकारची भाषा वापरावी लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘चंद्रशेखर : विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर पवार बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते अरूणकुमार श्रीवास्तव, कार्यक्रमाचे संयोजक अन्वर राजन, कमलताई पायगुडे, दिलीप पाटील, संदेश दिवेकर, दत्ता पाकिरे, बी. आर. माडगूळकर, साधना शिंदे आदी उपस्थित होते.

‘संसदीय लोकशाहीची एक गरिमा असते. विधीमंडळात, संसदेत बोलत असताना एक मोठी परंपरा आपण पुढे घेऊन जात असतो. नेत्यांनी पदावर असताना किंवा पदावर नसतानाही सन्मानाने वागले पाहिजे. पण, जनता पक्षाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो सत्तेत घुसला, तो खाली उतरायला तयार नाही. ही मंडळी शिरजोर झाली आहेत. माध्यमेही आता गुलाम झाली आहेत. अशी परिस्थिती असताना जनता नर्मदेच्या गोट्यासारखी शांत बसून आहे,’ असे पवार म्हणाले.

ते म्हणाले, ‘राजकारणात अनेक नेते आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. नितीश कुमार स्वतःला पुढचे पंतप्रधान म्हणून सादर करत होते. आता त्यांची अवस्था दयनीय आहे. आज चंद्रशेखर असते, तर त्यांनी अशा प्रकारचे तडजोडीचे राजकारण केले नसते. आपल्या देशात एक गंमत आहे की, चंद्रबाबू नायडू हे उद्याचे पंतप्रधान, मायावती, मुलायमसिंग यादव, शरद पवार इत्यादी नावांची चर्चा पुढचे पंतप्रधान म्हणून होत होती. आजची परिस्थिती वेगळी आहे, कोणीही पुढे येत नाही. चंद्रशेखर असते, तर त्यांनी आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडली असती, मोठा संघर्ष केला असता आणि कदाचित लाखो लोक त्यांच्या पाठीशी उभेही राहिले असते.’

‘पक्षांच्या कार्यकारिणीत शेकडो कार्यकर्ते’

‘काही नेते तडजोड करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भारतीय राजकारणाची एक शोकांतिका आहे. पूर्वी कांग्रेसच्या कार्यकारी समितीत फक्त २१ लोक असायचे. त्यानंतर ३५ किंवा ३७ सदस्यांची कार्यकारिणी असायची. आता मात्र काँग्रेसच नाही, तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकारिणीत शंभर-दोनशे, तीनशेपेक्षा जास्त कार्यकर्ते असतात,’ असेही पवार यांनी सांगितले.

अरुणकुमार श्रीवास्तव म्हणाले,‘समाजवादी विचार पुढे नेण्याची कधी नव्हे इतकी गरज आज निर्माण झाली आहे. चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेने देशातील सामाजिक वास्तव, ग्रामीण भारत आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज दिला. महात्मा गांधी, लोहिया यांच्या नंतर चंद्रशेखर यांनी देशातील युवा पिढीवर प्रेम केले आणि दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात कामाचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य होते. आज असे स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे.’ संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ ससाणे यांनी सूत्रसंचालन केले.