पुणे : ‘‘डीजे’मुळे कानठळ्या बसतात. हृदयाला त्रास होतो. अनेकांच्या घरात आजारी माणसं असतात. दुसऱ्याचा विचार करणे, हासुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी भाजपच्या नेत्यांसमोर ध्वनिक्षेपक भिंतींच्या (डीजे) वापरावरून गणेश मंडळांचे कान टोचले.
‘पुणे परिवार’च्या वतीने पवार यांना ‘लोकमान्य जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. महापौर मंजूषा नागपुरे, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे आमदार हेमंत रासने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जन्मेजयराजे भोसले, सुनील रासने, अण्णा थोरात, सूर्यकांत पाठक, महेश सूर्यवंशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, विनायक घाटे, शिरीष मोहिते, प्रकाश ढमढेरे आदी या वेळी उपस्थित होते.
‘राष्ट्रीय प्रबोधनासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. हा उत्सव तसाच साजरा करणे, हे लोकमान्यांचे स्मरण आहे. ‘डीजे’वर लावलेली गाणी अप्रस्तुत असू नयेत. या संपूर्ण उत्सवात मांगल्याला, प्रबोधनाला गालबोट लागेल, असे काहीही घडू नये. आपला मुलगा-मुलगी चांगल्या उत्सवात आहे, याची खात्री प्रत्येक आई-वडिलांना वाटावी, असे वातावरण आपण ठेवावे,’ अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
पवार म्हणाले, ‘सुरुवातीला गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये गुलालाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. मिरवणुकीतल्या गुलालामुळे डोळ्यांचे त्रास सुरू झाले. त्यामुळे त्या काळात तात्या गोडसे, कालनिर्णयकार साळगावकर दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील सर्व गणेश मंडळांची बैठक घेतली. गुलालाचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. आता गुलालाच्या वापराचे प्रमाण कमी झालेले दिसते.’
‘राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण, हा उत्सव राष्ट्रीय आहे. जाती-धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन समाजाने एकत्र यावे. गणेशोत्सव धार्मिक-आध्यात्मिक स्वरुपाचा असला, तरी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला त्यातून बळ मिळावे. गणपतीच्या माध्यमातून प्रबोधन व्हावं, संघटन व्हावं आणि सामाजिक आंदोलन व्हावं, ही लोकमान्यांची कल्पना होती. त्यापूर्वीच्या गणेशोत्सवात केवळ परिसंवाद व्हायचे,’ असेही त्यांनी नमूद केले.
महापौर काय म्हणाल्या?
पुणे शहराला सांस्कृतिक वारसा आहे. गणेशोत्सवाने शहराला जगभरात वेगळी ओळख मिळवून दिली. या माध्यमातून पुण्यात अनेक पुरस्कार, विविध उपक्रम राबवले जातात. शहराची एक धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता आहे. ती जपण्याचे काम आम्हा सर्व लोकप्रतिनिधींचे आहे,’ असे मत पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पुणे परिवारातर्फे ‘जय गणेश’ आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सेवा देणारे पराग बंगाळे, येरवडा मध्यवर्ती कारागृहात गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देणारे पुंडलिक खलोरकर, तालचक्र ढोल-ताशा पथकाचे ऋतिक कुडले आणि मकरंद शर्मा यांना ‘गणराया गुणगौरव’ विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष परेश हराळे, एरंडवणे येथील देशप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मंदार बलकवडे, धनकवडी येथील विद्यानगरी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक कुंभार, येरवडा येथील अखिल रामनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश चव्हाण आणि श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट तुळशीबागचे अध्यक्ष सागर दहिभाते यांना ‘आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेश सेवा पुरस्कार मनस्वी गोईलकर यांना, तर शिखंडी वाद्यपथकाला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
