अभागी शहर

गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांची चाळणी झाली आहे आणि याबद्दल एकही नगरसेवक ब्र सुद्धा काढत नाही.

लोकजागर : मुकुंद संगोराम

mukund.sangoram@expressindia.com

गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांची चाळणी झाली आहे आणि याबद्दल एकही नगरसेवक ब्र सुद्धा काढत नाही. रस्ते बांधणीचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे लागते, तरच ते दीर्घकाळ टिकतात. एकदा तयार केलेला रस्ता कोणत्याही कारणासाठी खणावा लागणार नाही, यासाठी नियोजन आवश्यक असते. दुधावर आलेली साय एकदा विस्कटली की ती कधीच पूर्ववत होत नसते. रस्त्यांचे तसेच. एकदा खणला की त्याला पुन्हा पूर्वपदावर आणता येत नाही. पण शहरातल्या सगळ्या नगरसेवकांना रस्ते तयार करण्याच्या ‘टेंडर’मध्ये कमालीचा रस असतो. त्यामुळे एकच एक रस्ता दरवर्षी पुन्हा कसा करता येईल, यासाठी त्यांना पाऊस आणि रस्ता बनवणारा कंत्राटदार पुरेपूर मदत करत असतो. पहिल्याच पावसात खड्डे पडलेच पाहिजेत, इतके हुकमी काम करणारे कंत्राटदार या पालिकेला कुठून मिळतात कोण जाणे? तरी गेल्या काही वर्षांत शहरातील मोठे रस्ते सिमेंटचे केले आहेत. आता तेही पुन्हा खोदायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ या रस्त्यांच्या नियोजनातच पाणी मुरले आहे, एवढाच होऊ शकतो.

दरवर्षी निदान पुण्यात तरी पाऊस जून महिन्यानंतरच येतो असा गेल्या काही शतकांचा अनुभव आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे जून महिन्यापूर्वीच करायची हा नियम. पण तो सर्रास धुडकावून शहरातील अनेक रस्ते आजच्या घडीलाही खोदून ठेवलेले आहेत. त्यामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळेच रस्त्यामध्ये वाहतुकीची कोंडी होते आहे. परंतु त्याकडे कुणाचे लक्ष नाही. ते मुद्दाम नाही. कारण लक्ष देऊन रस्ते कायमचे चांगले झाले, तर ते दरवर्षी कसे काय करता येतील? याचा घोर सगळ्या लोकप्रतिनिधींना असतो. त्यामुळे रस्ते कायमच खराब असणे हे या शहराच्या भाळी लिहिलेले सत्य आहे. रस्त्यांसाठी दरवर्षी होणारा काहीशे कोटी रुपयांचा खर्च दरवर्षीच्या पावसात वाहून जाताना, कुणाच्याही डोळ्यात आसवे जमा होत नाहीत. ती होत नाहीत याचे कारण रस्ते बांधणी हे एक मोठे कंत्राटी गौडबंगाल झालेले आहे. कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्याशिवाय हे घडणे अशक्य आहे.

सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या एका नगरसेवकाच्या घराच्या समोरच सिमेंटच्या रस्त्याला मोठे भगदाड पडले. जवळपासच्या नागरिकांनी तत्परतेने त्या खड्डय़ाला कुंपण घातले. साहजिकच वाहतूक कोंडी होऊ लागली. सिमेंटचा रस्ता असा कसा बनतो, याची चर्चा होऊ लागली आहे. हे सगळे आठवडाभर सुरूच राहिले. हे शहरातील अनेक भागात नेहमी दिसणारे चित्र आहे. याचे कारण एकच. रस्ते तयार होत असताना ना कोणी अधिकारी त्यावर लक्ष ठेवतो, ना लोकप्रतिनिधी. कुणालाच काही पडलेले नाही. रस्ते हे पालिकेतील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे कुरण आहे, असे सगळे जण जाहीर बोलू लागले, तरी त्याबद्दल कुणावरही एकदाही कारवाई होत नाही. कागदावर एखाद्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाते. मग तोच कंत्राटदार दुसरी कंपनी स्थापन करतो आणि त्याला पुन्हा काम मिळू लागते. ही मिलीभगत आपण सर्व मूर्ख नागरिक डोळ्यांनी हतबलपणे पाहत असतो.

शहरातील रस्ते तेथील नागरिकांचे दळणवळण सुरळीत करते. मात्र ते दिवसेंदिवस इतके भयावह अवस्थेला पोहोचते आहे, की ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल, हे कुणीच ठरवू शकत नाही. खड्डय़ांमुळे हा वेळ अधिकच वाढतो. तो कमी करणे ज्यांच्या हाती, त्या सगळ्या यंत्रणा ढिम्मपणे काम करत आहेत. दर्जाची हमी केवळ कागदोपत्री देणाऱ्या कंत्राटदारांना जरब बसवायची तरी कशी, हा पुणे शहरासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Unfortunate city lokjagar heavy rain road under water ssh