गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या राज्याच्या दौर्‍यावर असून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या हस्ते महाभिषेक आणि आरती करण्यात आली. त्यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश करोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, यासोबतच सुजलाम् सुफलाम् भारतासाठी त्यांनी प्रार्थना केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री झाल्यापासून अमित शाह यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यामुळे भाजपासाठी अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने शाह यांच्या दौऱ्याची सुरूवात झाली. आता पुढे ते CFSL कॅम्पसमधल्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील. त्यानंतर NDRF जवानांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम असेल. संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण अमित शाह करतील. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जातील.