पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे शुक्रवारी (४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

प्रबोधिनीमध्ये सकाळी पावणेअकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, प्रबोधिनीचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह उपस्थित राहणार आहेत.

अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात या भावनेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून, कुंदनकुमार साठे सचिव आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यासाठी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या मदतीने अमित शहा यांनी सहकार्य केल्याने पुतळा उभा करण्याची परवानगी मिळाली. सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचेही पुतळा उभारण्यात सहकार्य लाभले आहे.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने साडेतेरा फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. चार हजार किलो ब्राँझचा वापर करून विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अवघ्या चार दशकांच्या आयुष्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळविला होता. प्रबोधिनीतील छात्रांना अजेय योद्धा पेशवे यांचा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरेल,’ अशी भावना भूषण गोखले आणि कुंदनकुमार साठे यांनी व्यक्त केली.