पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम आणि मुलगा, आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

आमदार नीतेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील २५ कोटींची परतफेड झाली नाही. त्यामुळे ‘डीएचएफएल’ने राणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर

पोलिसांनी नीतेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. राणे कुटुंबाने ‘डीएचएफएल’कडून आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडसाठी कर्ज घेतले होते. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नीतेश राणे सहअर्जदार आहेत. कर्जाच्या उर्वरित रकमेची परतफेड न करता राणे कुटुंब परदेशात जाऊ शकते. त्यामुळे ही लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

‘‘याबाबत केंद्र सरकारकडून गृह विभागाला एक पत्र प्राप्त झाले होते. त्यानंतर ते पत्र आम्ही पुणे पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी दिले’’, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील सांगितले.