पुणे : शहरातील वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्याचे चित्र वारंवार दिसते. यामुळे आता दुचाकी रुग्णवाहिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता पुण्यातील रस्त्यांवर दुचाकी रुग्णवाहिका धावणार असून, वाहतूक कोंडीतूनही त्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या रुग्णाला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात नेण्यासाठी पहिली पाच ते सात मिनिटे हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. पुण्यातील वाहतुकीची खराब स्थिती पाहता हा वेळ तब्बल ३० ते ४० मिनिटांवर पोहोचला आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यास होणारा विलंब हा त्याच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच अनेक जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे रूबी हॉल क्लिनिकने दुचाकी रुग्णवाहिका हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात रुग्णालयाचे मुख्य कार्यपालन अधिकारी उर्वक्ष भोट आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांच्या हस्ते झाले.

आणखी वाचा-महाराष्ट्र पुन्हा तापला, चंद्रपुरात पारा ४३.६ अंशांवर

एखाद्या रुग्णाला आपत्कालीन स्थितीत त्याच्या घरातून अथवा इतर ठिकाणाहून रुग्णालयात आणण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेचा वापर होईल. या रुग्णवाहिकेत अत्यावश्यक औषधे, ईसीजी यंत्र, आपत्कालीन उपचाराची साधने आणि इतर उपकरणे असतील. यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेला जीपीएस यंत्रणा बसविलेली असेल. त्यामुळे रुग्णालयातून या रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी योग्य दिशादर्शन केले जाईल, अशी माहिती रुबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी यांनी दिली.

पुण्यातील रस्त्यावरून रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब होतो. कारण शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी कायम असते. दुचाकी रुग्णवाहिकेमुळे रुग्णापर्यंत पोहोचणे आणि त्याला रुग्णालयात दाखल करणे याचा कालावधी कमी करण्यात आपल्याला यश येईल. -डॉ. परवेझ ग्रँट, अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त, रुबी हॉल क्लिनिक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique solution to traffic congestion in pune a two wheeled ambulance will run on the road pune print news stj 05 mrj