पुणे : विश्व किती वेगाने विस्तारत आहे, या खगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे आजवरचे सर्वांत अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटाने शोधले आहे. या संशोधनानुसार, विश्वाच्या विस्ताराचा वेग ७३.५ किलोमीटर प्रतिसेकंद प्रतिमेगापार्सेक इतका असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या संशोधनात पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) प्रा. अनुपम भारद्वाज यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
‘आयुका’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या संशोधनाबाबतची माहिती दिली. हे संशोधन विश्वाच्या विस्ताराच्या अभ्यासातील महत्त्वाचा टप्पा असून, ‘हबल टेन्शन’ची उकल करण्यासाठी नवे मार्ग खुले होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. विश्वाच्या विस्ताराच्या दराबाबतचा शोधनिबंध ‘ॲस्ट्रोनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. गेल्या जवळपास शतकभरापासून खगोलशास्त्रज्ञ ‘डिस्टन्स लॅडर’ या पद्धतीने विश्वाचा विस्तार मोजण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, या पद्धतीत अनेक टप्प्यांची साखळी असल्याने एखाद्या टप्प्यातील त्रुटीचा परिणाम अंतिम निष्कर्षावर होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून ‘हबल कॉन्स्टंट डिस्टन्ट नेटवर्क’च्या सहकार्याने ‘लोकल डिस्टन्स नेटवर्क’ ही नवी संकल्पना वापरण्यात आली.
या पद्धतीमध्ये मोजमाप केवळ एका पद्धतीवर आधारित नाही, तर अनेक स्वतंत्र खगोलीय पद्धती एकत्रित करण्यात आल्या. त्यात विशिष्ट प्रकारचे तारे, स्फोट होणारे तारे (सुपरनोव्हा), तसेच दीर्घिकांच्या इतर गुणधर्मांचा वापर करण्यात आला. त्यामुळे एखाद्या पद्धतीतील चूक अंतिम उत्तरावर परिणाम करू शकत नाही, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
नव्या संशोधनानुसार, विश्वाच्या विस्ताराचा दर म्हणजेच हबल स्थिरांक अत्यंत कमी त्रुटींसह मोजण्यात आला आहे. त्यानुसार, हा दर ७३.५ किलोमीटर प्रतिसेकंद प्रतिमेगापार्सेक इतका असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. मेगापार्सेक हे अंतर मोजण्याचे खगोलशास्त्रीय माप असून, मेगापार्सेक सुमारे ३.२६ दशलक्ष प्रकाशवर्षांइतका असतो. सोप्या भाषेत समजून घ्यायचे, तर आपल्यापासून आकाशगंगा जितकी दूर आहे, तितक्या जास्त वेगाने ती आपल्यापासून दूर जात आहे.
या अत्यंत अचूक मोजमापामुळे आधुनिक खगोलशास्त्रातील मोठे कोडे असलेल्या ‘हबल टेन्शन’च्या उकलीला आणखी बळ मिळाले आहे. स्थानिक विश्वावर आधारित मोजमापे आणि कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड यावर आधारित अंदाजांमध्ये लक्षणीय फरक आढळतो. ‘हबल कॉन्स्टंट डिस्टन्ट नेटवर्क’चा अंदाज हा प्रारंभिक विश्वावर आधारित लॅम्बडा सीडीएम मॉडेलमधील मूल्यापेक्षा सुमारे १० टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे हा फरक ही केवळ मोजमापातील चूक नसून, नव्या भौतिकशास्त्राकडे निर्देश करणारा असू शकतो, असे संशोधकांचे मत आहे.
या संशोधनामुळे विश्वाचे वय, आकार आणि भविष्यातील बदल यांचा अधिक अचूक अंदाज लावणे, तसेच विश्वाचा विस्तार वाढविणाऱ्या गूढ कृष्ण पदार्थाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले.
सेफिड आणि मीरा प्रकारचे तारे अंतर मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा ताऱ्यांच्या प्रकाशमानतेचे अचूक मोजमाप करण्याचे संशोधन करण्यात येत आहे. या माहितीमुळेच विश्वाच्या विस्ताराचा दर इतक्या अचूकतेने मोजणे शक्य झाले. – प्रा. अनुपम भारद्वाज, खगोलशास्त्रज्ञ, आयुका
हबल स्थिरांक म्हणजे काय?
हबल स्थिरांक म्हणजे विश्व सध्या किती वेगाने विस्तारत आहे, हे सांगणारा मूलभूत खगोलशास्त्रीय स्थिरांक आहे. एखादी आकाशगंगा आपल्यापासून जितकी दूर असते, तितक्या जास्त वेगाने ती दूर जाते. यातील अंतर आणि वेग यांच्यातील संबंधाला हबल स्थिरांक म्हटले जाते.
