पुणे : ब्रह्मांडाच्या मापनासाठी खगोलशास्त्रज्ञांनी ‘शिअर रेशियो’ या अभिनव भौमितिक चाचणी वापर केला आहे. या पद्धतीचा वापर करून शास्त्रज्ञांनी ‘रेडशिफ्ट’मधील त्रुटी दुरुस्त करताना विश्वातील पदार्थाची घनता आणि असमानतेची तीव्रता या संबंधित महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले असून, कृष्ण पदार्थ (डार्क मॅटर), विश्वाच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांना असलेल्या अचूक आणि विश्वासार्ह विदेसाठी ‘शिअर रेशियो’ ही पद्धती महत्त्वाची ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.
आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) प्रा. सुहृद मोरे, नेदरलँडमधील लायडन विद्यापीठातील डॉ. दिव्य राणा यांचा या संशोधनात सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘फिजिकल रिव्ह्यू डी’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. सुदूर दीर्घिकांमधून येणाऱ्या अतिशय क्षीण प्रकाशाच्या आधारे विश्वाचा इतिहास आणि रचना उलगडण्याचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ करत आहेत.
दीर्घिकांचा प्रकाश, पृथ्वीपर्यंत पोहोचतानाच्या मार्गातील जवळच्या दीर्घिकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे वाकतो आणि विकृत होतो. या प्रक्रियेला ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ म्हटले जाते. या तंत्राद्वारे विश्वातील पदार्थांचे, विशेषतः अदृश्य कृष्ण पदार्थाचे नकाशे तयार करून विश्वातील रचनांची वाढ कशी होते, याचा अभ्यास केला जातो. यामध्ये ‘रेडशिफ्ट’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते.
‘रेडशिफ्ट’ हे विश्वाच्या प्रसरणामुळे प्रकाश किती ताणला गेला आहे, याचे मोजमाप असते. मात्र, यातील अनिश्चिततेमुळे विश्वाच्या विविध वैश्विक परिमाणांच्या मोजमापात पूर्वग्रह निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक दीर्घिकेचा अचूक रेडशिफ्ट मोजणे वेळखाऊ असल्याने प्रामुख्याने दीर्घिकांच्या रंगांवरून त्यांचा अंदाज लावला जातो. ही पद्धत पूर्णतः अचूक नसल्याने त्यात काही प्रमाणात त्रुटी राहतात, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
‘रेडशिफ्ट’बाबतच्या समस्येवर उपाय म्हणून ‘शिअर रेशियो’ या अभिनव भौमितिक पद्धतीचा वापर करण्यात आला. या पद्धतीत एका पार्श्वभूमीवरील संचातील दीर्घिकांवरच लक्ष केंद्रित न करता समोरच्या एकाच दीर्घिकांच्या संचांनी वेगवेगळ्या ‘रेडशिफ्ट’वर असलेल्या पार्श्वभूमींनी दीर्घिकांच्या प्रकाशाला कसे वाकवले, याची तुलना केली जाते. या तुलनेमुळे वायू, तारे आणि दीर्घिका निर्मितीशी संबंधित गुंतागुंतीचे घटक आपोआप नगण्य ठरून विश्वाच्या भूमितीचे एक ‘स्वच्छ’ मोजमाप मिळते. त्यामुळे ‘रेडशिफ्ट’च्या अंदाजातील त्रुटी अचूकपणे शोधून तिचा ब्रह्मांड मापनासाठी वापर करता येतो.
ही पद्धत सुबारू हायपर सुप्रीम-कॅम (एसएसडी) या दीर्घिकांच्या सर्वेक्षणातील विदेवर यशस्वीरित्या वापरण्यात आली. या प्रकल्पात अवकाशातील पदार्थांचे व्यापक ‘मॅपिंग’ करण्यात येत आहे. यामध्ये ‘रेडशिफ्ट’मधील त्रुटी दुरुस्त करताना विश्वातील पदार्थाची घनता आणि असमानतेची तीव्रता याच्याशी संबंधित महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवण्यात आले, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
भविष्यातील मोठ्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षणांमध्ये ‘रेडशिफ्ट’मधील अनिश्चितता ही एक मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. या अभ्यासातून ‘शिअर रेशियो’ पद्धत रेडशिफ्ट मोजमापांची पडताळणी करण्यासाठी प्रभावी आणि स्वतंत्र साधन ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे. – प्रा. सुहृद मोरे, आयुका.
