विद्यापीठे ही आता फक्त पदवी देणारी केंद्र बनली असून विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे बदलण्यात येत नाहीत. संख्यात्मक वाढ करताना शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी केली.
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभामध्ये पाटील बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे, पश्चिम विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे, सचिव गणेश ठाकूर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विजय कोलते, डॉ. अरविंद बुरूंगले, माजी आमदार सूर्यकांत पालांडे आदी उपस्थित होते.
या वेळी पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत मिळणाऱ्या शिक्षणाचा भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोग होतो का, हे पाहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यांना रोजगारभिमुख बनवण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.’