पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२०वा पदवी प्रदान सोहळा गुरुवारी ( १२ मे) रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार असून, एकूण १ लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पाठवली जातील.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे पदवी प्रदान कार्यक्रमाची माहिती दिली. गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे अत्यंत मर्यादित स्वरुपात पदवी पदान कार्यक्रम करण्यात आला होता. मात्र आता करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. डॉ. करमळकर, डॉ. उमराणी यांचा कार्यकाळ १७ मे रोजी संपत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील हा अखेरचा पदवी प्रदान कार्यक्रम आहे.

शैक्षणिक वर्ष एप्रिल /मे २०२१ या वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएच.डी., एम.फिल., स्तरावरील एकूण १ लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये ३०९ पीएचडीधारक आहेत. या समारंभादरम्यान ७५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. यंदाच्या या पदवीप्रदान सोहळ्यात प्रत्यक्ष पदवी प्रमाणपत्र स्वीकारता येणार नसले तरी सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.