पुणे : उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानसिक आरोग्य आणि कल्याण केंद्र, मानसिक आरोग्य आणि कल्याण देखरेख समितीची स्थापना, १०० विद्यार्थ्यांमागे किमान एक मानसिक आरोग्य तज्ज्ञाची नियुक्ती अशा काही महत्त्वाच्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांना वेळेवर साहाय्य करण्यात संस्थात्मक पातळीवर आलेल्या अपयश यांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘यूजीसी’ने मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या मार्गदर्शक सूचनांना ‘उच्च शिक्षण संस्थांसाठी मानसिक आरोग्य व कल्याणासाठीचे एकसमान धोरण’ असे नाव देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एकसमान, अंमलबजावणीयोग्य चौकट उभी करण्याचा या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश आहे. या मार्गदर्शक सूचनांवर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन, प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा, मानससेतू या संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘यूजीसी’कडून उच्च शिक्षण संस्थांना साहाय्य करण्यात येईल.

प्रस्तावित तरतुदी

  • शिक्षण संस्थांमध्ये मानसिक आरोग्य साहाय्य उपलब्ध करून देणे अनिवार्य.
  • विद्यार्थ्यांच्या मानसिक-सामाजिक तक्रारींसाठी राष्ट्रीय स्तरावरील मानसिक आरोग्य मदतवाहिनी (हेल्पलाइन) सुरू करणे.
  • १०० किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेत किमान एका पात्र मानसिक आरोग्यतज्ज्ञाची नियुक्ती.
  • मानसिक आरोग्य व कल्याण केंद्राची स्थापना.
  • संबंधित केंद्राद्वारे मानसिक आरोग्य साहाय्य, मार्गदर्शन, मानसोपचार सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.
  • विद्यार्थ्यांची गोपनीयता आणि खासगीपणा जपणे.
  • मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीवर ‘मानसिक आरोग्य व कल्याण देखरेख समिती’मार्फत देखरेख.
  • शिक्षण संस्थांमध्ये मानसिक आरोग्य तज्ज्ञ, मदतवाहिनीचे संपर्क क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करणे.
  • मानसिक आरोग्य केंद्र, मानसिक आरोग्य व कल्याण देखरेख समितीमध्ये मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्यतज्ज्ञांची नेमणूक.
  • विद्यार्थी आत्महत्या प्रतिबंधक पायाभूत सुविधा, आपत्ती प्रतिसाद आणि आपत्तीनंतर पुनर्वसनासाठी योजना राबवणेही आवश्यक.

मानसशास्त्र विभाग असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानसिक आरोग्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणी करणे तुलनेने सोपे आहे. मात्र, प्राध्यापकांना मानसिक आरोग्याबाबत प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांच्या क्षमता विकसित करण्याची गरज आहे. काही प्रकरणांत क्लिनिकल मार्गदर्शनाचीही गरज पडू शकते. त्या दृष्टीने उच्च शिक्षण संस्थेत सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांवरील अभिप्राय नोंदवला आहे. – डॉ. अविनाश मोहरील, प्राचार्य, स. प. महाविद्यालय, पुणे</p>