पिंपरी : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेला लवकरच विद्यापीठाचा दर्जा दिला जाणार असून त्या दृष्टीने मंत्रिमंडळाने आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चिंचवड येथे बोलताना दिली. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळय़ात ते बोलत होते. माजी आमदार राम कांडगे अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने गृहमंत्र्यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना मानपत्रही देण्यात आले.

वळसे म्हणाले, निरपेक्ष भावनेने छोटय़ा स्वरूपात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या या संस्थेत आजमितीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी आणि १५ हजार अध्यापक आहेत. रयतने खेडय़ापाडय़ात ज्ञानदानाचे काम केले. संस्थेत आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशविदेशात महत्त्वाच्या हुद्दय़ांवर काम करत आहेत. रयतला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, हे कर्मवीरांचे स्वप्न होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते साकार होणार आहे.