पालकांनीही सजग राहावे  * पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या शाळांना सूचना

शाळेतील असुरक्षित वातावरण म्हणजे एक प्रकारचा गुन्हा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय प्रशासनाबरोबरच पालकांनी सजग राहावे, अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी दिल्या.

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या आवारात हत्या झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांकडून तातडीने शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पोलीस आयुक्त शुक्ला यांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्याशी संवाद साधून त्यांना काही सूचना दिल्या. या बैठकीत विविध शाळांमधील सातशे मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले होते. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, दीपक साकोरे, डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त गणेश गावडे या प्रसंगी उपस्थित होते.

शुक्ला म्हणाल्या की, गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत दुसरीतील विद्यार्थ्यांची शाळेच्या आवारात हत्या झाल्यानंतर मला धक्का बसला. विद्यार्थ्यांसाठी शाळेत सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. असुरक्षित वातावरण म्हणजे एक प्रकारचा गुन्हा आहे. शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अजिबात काणाडोळा करु नये. शालेय प्रशासन आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील राहावे. शाळेतील कर्मचारी, मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांची चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून ‘पोलीस काका’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात आणखी शाळांनी सहभाग नोंदवावा.

सीसीटीव्ही चित्रीकरणाचे परीक्षण क रावे

प्रत्येक शाळेकडून शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिन्यातून एकदा पालकांना बोलावून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून करण्यात आलेल्या चित्रीकरणाचे परीक्षण (सीसीटीव्ही कॅमेरा ऑडीट) करावे. पालकांमार्फत शाळेतील सुरक्षेची पडतळणी करण्यात यावी. चारित्र्य पडताळणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घ्यावे. शाळेच्या आवारातील सुरक्षेचे परीक्षण (सिक्युरिटी ऑडीट) नजीकच्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून करुन घेण्यात यावे. एखाद्या कर्मचाऱ्याचे वागणे संशयास्पद वाटत असेल तर त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, अशा सूचना शुक्ला यांनी दिल्या.

शाळांकडून करण्यात आलेल्या सूचना

* शाळेबाहेरील वस्तीतील मुलांचा उपद्रव

* शाळा भरणे तसेच सुटण्याच्या वेळी होणारी कोंडी

* शाळेबाहेरील रस्त्यांची दुर्दशा

*  उपद्रवी मुलांवर वचक बसवावा