यंदा हंगाम बेताचा; अवेळी पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका

पुणे : रसदार, लालचुटूक स्ट्रॉबेरीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून यंदा स्ट्रॉबेरीच्या हंगामाला अवेळी झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, तापमान वाढल्यामुळे स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे आणि स्ट्रॉबेरीचे दरही कमी झाले आहेत.

स्ट्रॉबेरीचा हंगाम आणखी माहिनाभर सुरू राहील. किरकोळ बाजारात दोन किलो स्ट्रॉबेरीची विक्री १५० ते १८० रुपये या दराने केली जात आहे. किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरीचे अडीचशे ग्रॅमचे पनेट (प्लास्टिकचे छोटे खोके) विक्रीस उपलब्ध झाले असून किरकोळ ग्राहकांकडून पनेटला चांगली मागणी आहे. घाऊक बाजारात एका पनेटची विक्री २५ ते ३० रुपये या दराने केली जात आहे. यंदाच्या हंगामात अवेळी झालेल्या पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका बसला आहे. लागवड करण्यात आलेली स्ट्रॉबेरी भिजल्यामुळे प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पादन चाळीस ते पन्नास टक्क्यांनी कमी झाले, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील स्ट्रॉबेरीचे व्यापारी बाळासाहेब मनसुख यांनी दिली.  मनसुख म्हणाले, मार्केटयार्डातील फळबाजारात वाई, पाचगणी, महाबळेश्वर भागातून दररोज १५०० ते २००० ‘ट्रे’मधून स्ट्रॉबेरीची आवक होत आहे. एका ‘ट्रे’मध्ये साधारपणपणे दोन किलो स्ट्रॉबेरी बसते. १५ दिवसांपूर्वी  ४००० ते ५००० हजार ‘ट्रे’मधून स्ट्रॉबेरीची आवक व्हायची. घाऊक बाजारात दोन किलोच्या ‘ट्रे’ला ८० ते १०० रुपये असा दर मिळत आहे. हंगामांच्या सुरुवातीला ‘ट्रे’ला २०० ते २२० रुपये असा दर मिळाला होता.

स्ट्रॉबेरीचा हंगाम दोन महिने उशिरा

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली होती. नाताळात स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी असते. यंदाच्या हंगामात अवेळी झालेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम दोन महिने उशिरा सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून तापमानातील चढउतारामुळे स्ट्रॉबेरीच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. स्ट्रॉबेरीचे दरही कमी झाले आहेत. स्ट्रॉबेरीचा हंगामातील दुसरा बहर सुरू झाला आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम महिनाभर सुरू राहील. सध्या ज्युस विक्रेते, आईस्क्रीम तसेच पल्प उत्पादक, किरकोळ विक्रेत्यांकडून स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असल्याचे स्ट्रॉबेरीचे व्यापारी बाळासाहेब मनसुख यांनी सांगितले.

स्ट्रॉबेरीचे किरकोळ बाजारातील दर

  • दोन किलो- १५० ते १८० रुपये
  •  स्ट्रॉबेरी पनेट अडीचशे ग्रॅम (प्लास्टिक चे छोटे खोके)- २५ ते ३० रुपये