पुणे : आधुनिक युद्ध केवळ शस्त्रास्त्रांनी लढले जात नाही; ते कल्पनांनी, नवोन्मेषांनी आणि नैतिक धैर्याने लढले जाते. बालाकोटमध्ये भारताने घेतलेला निर्णय हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे अचूकता, उद्दिष्ट सिद्ध करण्याची शिस्त आणि संयत संवाद होता. आज विद्वान-योद्धा ही संकल्पना नव्या ताकदीने परत उदयास येत आहे. बुद्धी, पराक्रम, चिंतन आणि कृतीचा संगम विद्वान योद्ध्यात असतो. गलवानच्या संकटकाळात मी अशा संतुलनाची असंख्य उदाहरणे अनुभवली. तणावाच्या वेळीही अधिकाऱ्यांनी धैर्य आणि स्पष्ट विचार यांचा अद्वितीय संगम साधला, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए ) १४९व्या तुकडीच्या दीक्षांत कार्यक्रमात अजयकुमार बोलत होते. एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी, प्राचार्य डॉ. विनय दीप या वेळी उपस्थित होते. दीक्षांत समारंभात ३२९ स्नातकाना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पदवी प्रदान करण्यात आल्या. त्यात ७२ छात्रांना विज्ञान, ९२ छात्रांना संगणकशास्त्र, ५४ छात्रांना कला आणि १११ छात्रांना बी. टेक पदवी प्रदान करण्यात आली.
मित्र देशांतील १५, तर १५ महिला छात्रांचा त्यात समावेश आहे. विज्ञान शाखेचे रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञान शाखेचे रौप्य पदक अनन्या बालोनी, कला शाखेचे रौप्य पदक अनुराग गुप्ता, बी. टेक शाखेतील रौप्य पदक विश्वेश भालेराव यांना प्रदान करण्यात आले.
छात्रांना मार्गदर्शन करताना डॉ. अजय कुमार म्हणाले, आज तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाचा वेग अभूतपूर्व आहे. तंत्रज्ञान, भू-राजकारण आणि विचारविश्वात होणारा बदल जगाचे भविष्य नव्याने आकारत आहे. संरक्षण मंत्रालयात काम करताना मला हा बदल जवळून अनुभवण्याची संधी मिळाला. स्वदेशी संरक्षण क्षमतांचा विस्तार, सायबर आणि अंतराळासारख्या नवीन युद्धक्षेत्रांचा उदय आणि स्वयंचलित प्रणालींचे महत्त्व वाढत आहे.
एखाद्या राष्ट्राची खरी महानता ही केवळ त्याच्या शक्तीत नसते; ती त्याच्या संकटकाळातील नैतिक दिशादर्शक न ढळता बदलाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेत असते. व्यक्तीची महानताही अखंड श्रद्धा, विवेकपूर्ण विचार आणि परिवर्तनाशी सुसंगततेत दडलेली असते.
बुद्धी आणि धैर्य या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात, तो अजेय ठरतो, असे कौटिल्याचे वचन आहे. आजच्या नेतृत्वाचे हेच सूत्र आहे. या शतकातील निर्णायक लढाया मन आणि विचारांच्या पातळीवरही लढल्या जातील. त्यात बुद्धिमत्तेने, करुणेने आणि सत्यनिष्ठेने नेतृत्व करणाऱ्यांचा विजय होईल. तयारी म्हणजे केवळ रणनीती किंवा शारीरिक प्रशिक्षण नाही; तर ती नैतिक आणि बौद्धिक तयारीही असते.
खरा नेता आदेशापेक्षा वर्तन, संवेदनशीलता आणि नैतिक उदाहरणाने नेतृत्व करतो. त्यामुळे जबाबदारी सीमारेषांपलाकडील आहे. ज्ञानसाधनेत कधीही कधीही खंड पडू न देता पुढे जाणे गरजेचे आहे. भविष्यातील युद्धक्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता, नेटवर्क आधारित प्रणाली, सायबर आण् अंतराळशक्ती यांच्या नव्या स्वरूपात उभे राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिक यश, वैयक्तिक समृद्धीसाठी बौद्धिक तयारी सतत आवश्यक आहे.
सुरक्षित राष्ट्रच खऱ्या विकासाचे, नवोन्मेषाचे आणि जागतिक प्रतिष्ठेचे पायाभूत कारण असते. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याची आकांक्षा बाळगत असताना, त्या ध्येयाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, असेही डॉ. अजयकुमार यांनी सांगीतले.

