पुणे ः केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात राज्यातील उमेदवारांच्या यशाचा डंका वाजला आहे.
यूपीएससीतर्फे ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. त्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात पहिले, राजेश्वरी सुवे एम. यांनी द्वितीय, आकांश धुल्ल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
निकालातील पहिल्या १०० क्रमांकांत राज्यातील उमेदवारांनी स्थान प्राप्त केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, किरण कामठे यांनी ५३वा, हृषिकेश अलासे यांनी ६१वा, सायली पगार यांनी ८७वा, दीक्षा पाटकर यांनी ८८वा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता पाटील यांनी १४०, कार्तिक बच्छाव यांनी १७७, राहुल पाटील यांनी २२५, शुभम बेहेरे यांनी २२६, ऋषिकेश पालीमकर यांनी २८३, मोहिनी जगताप यांनी ३२३, हर्षवर्धन पाटील यांनी ३४९, हर्षवर्धन तिडके यांनी ३५५, कुणाल अहिरराव यांनी ४३०, अभिषेक मगदूम यांनी ४४९, धनश्री अहिरे यांनी ४८९, तर मनोज पाटील यांनी ४९३वा क्रमांक मिळवला आहे.
दरम्यान, आयोगाने विविध सेवांसाठी एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस केली असली, तरी अंतिम नियुक्त्या संबंधित सेवांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येवर अवलंबून असतील. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) एकूण १८० पदे, भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) साठी एकूण ५५ पदे, आयपीएससाठी १५०, केंद्रीय सेवा गट अ साठी ५०७, गट ब साठी १९५ पदे उपलब्ध असतील.
जाहीर केलेल्या निकालामध्ये ३४८ उमेदवारांची शिफारस सध्या तात्पुरत्या स्वरूपातील आहे, तर २ उमेदवारांचे निकाल सध्या रोखून ठेवण्यात आले आहेत. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी केलेल्या सर्व आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी संबंधित प्राधिकरणांकडून केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
