पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२५मध्ये देशभरातील उमेदवारांमध्ये कठोर स्पर्धा झाल्याचे दिसून झाले आहे. परीक्षेसाठी ९ लाख ३७ हजार ८७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असे विविध टप्पे पार पाडून पात्र ठरलेल्या केवळ ९५८ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

यूपीएससीने जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५च्या निकालाच्या अनुषंगाने केंद्रीय पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) निकालातील ठळक मुद्द्यांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. नागरी सेवा परीक्षा २०२५ची पूर्व परीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली. त्यासाठी नोंदणी केलेल्या ९ लाख ३७ हजार ८७६ उमेदवारांपैकी ५ लाख ७५ हजार ७९३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

त्यातून लेखी (मुख्य) परीक्षेसाठी १४ हजार १६१ उमेदवार पात्र ठरले. मुख्य परीक्षा ऑगस्टमध्ये झाली. त्यातून २ हजार ७३६ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. मुलाखतींतून पात्र ठरलेल्या ९५८ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये ६५९ पुरुष, तर २९९ महिला आहेत. गुणवत्ता यादीतील पहिल्या पाच उमेदवारांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे.

देशात पहिले आलेल्या अनुज अग्निहोत्री यांनी जोधपूर येथील एम्समधून वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) प्राप्त केली आहे. द्वितीय स्थानी असलेल्या राजेश्वरी सुवे एम. या अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी चेन्नईतील अण्णा विद्यापीठात शिक्षण घेतले. तृतीय स्थान असलेले आकांश धुल दिल्ली विद्यापीठाचे वाणिज्य पदवीधर (बी.कॉम) आहेत. चौथ्या क्रमांकावरील राघव झुंझुनवाला यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी (बीए ऑनर्स) घेतली आहे. तर पाचव्या स्थानी असलेल्या ईशान भटनागर यांनी दिल्लीतील राष्ट्रीय विधी विद्यापीठातून कायद्याची पदवी (बी.ए. एलएलबी ऑनर्स ) घेतली आहे. पहिल्या २५ उमेदवारांची शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी, मानवशास्त्र, विज्ञान, वाणिज्य, कायदा, वैद्यकीय विज्ञान, मास मीडिया अशा विविध शाखांतील पदवीपर्यंतची आहे.

शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये एकूण ४२ दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. त्यात १० अस्थिव्यंग, १४ दृष्टिहीन, ९ श्रवणबाधित आणि ९ बहुविकलांग उमेदवारांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.