पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. देशभरातील केवळ ९५८ पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात राज्यातील सुमारे ६० उमेदवारांचाही समावेश आहे. दहावीपासून यूपीएससीपर्यंत सर्वच परीक्षांमध्ये किती गुण, टक्के मिळाले याची चर्चा होते. मात्र, यूपीएससीमध्ये डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी ५२.८८ टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे २०१५-२०२५ या वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतला असता ५२ ते ५५ टक्के मिळवणारा उमेदवार देशात पहिला क्रमांक मिळवत असल्याचे दिसून येते.
यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्प्यांत उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया राबवली जाते. मुख्य परीक्षेचे १७५० गुण आणि मुलाखतीचे २७५ गुण मिळून एकूण २०२५ गुणांच्या आधारे नागरी सेवा परीक्षेची अंतिम गुणवत्तायादी तयार केली जाते. पूर्वपरीक्षेचे ४०० गुण आणि मुख्य परीक्षेतील दोन भाषा विषयांचे ६०० गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. २०१५पासूनच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, २०१७मध्ये अनुदीप दुरीशेट्टीने सर्वाधिक ५५.६० टक्के गुण मिळवले होते, २०२४मध्ये शक्ती दुबेला मिळालेले १०४३ गुण आणि ५१.५० टक्के हे गेल्या १० वर्षांतील सर्वांत कमी गुण होते.
नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ची पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली. त्यासाठी ९ लाख ३७ हजार ८७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५ लाख ७५ हजार ७९३ उमेदवारांतून मुख्य परीक्षेसाठी १४ हजार १६१ उमेदवार पात्र ठरले. मुख्य परीक्षा ऑगस्ट २०२५मध्ये घेण्यात आली. त्यातून मुलाखतीसाठी २ हजार ७३६ उमेदवारांची निवड करण्यात आली. मुख्य परीक्षा, मुलाखतीतील गुणांच्या आधारे ९५८ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली. त्यात ६५९ पुरुष, तर २९९ महिला आहेत. गुणवत्तायादीतील पहिल्या पाच उमेदवारांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर, पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे.
वर्ष – उमेदवाराचे नाव – एकूण गुण – टक्केवारी
२०२५ अनुज अग्निहोत्री १०७१ ५२.८८
२०२४ – शक्ती – दुबे – १०४३ – ५१.५०
२०२३ – आदित्य – श्रीवास्तव – १०९९ – ५४.२७
२०२२ – इशिता किशोर – १०९४ – ५४.०२
२०२१ – श्रुती शर्मा – ११०५ – ५४.५६
२०२० शुभम कुमार १०५४ ५२.०४
२०१९ – प्रदीप सिंह – १०७२ – ५२.९३
२०१८ – कनिष्क कटारिया – ११२१ – ५५.३५
२०१७ – अनुदीप दुरीशेट्टी – ११२६ – ५५.६०
२०१६ – नंदिनी के. आर. – ११२० – ५५.३०
२०१५ – टीना डाबी – १०६३ – ५२.४९
