दाटीवाटीच्या भागांमध्ये अधिक प्रमाणात पसरणारा स्वाइन फ्लू आता केवळ शहरी आजार राहिलेला नाही. वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचे परिणाम जसे डेंग्यूच्या ग्रामीण भागातील फैलावाच्या रुपाने दिसू लागले, तसेच ते स्वाइन फ्लूबद्दलही दिसत आहेत. चालू वर्षी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२.८० टक्के मृत्यू ग्रामीण भागातले असल्याचे समोर आले आहे. एकूण मृत्यूंपैकी ५३ टक्के रुग्णांना इतर आजार असून त्यातही उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय होते, तर ४६ टक्के रुग्णांना कोणताही इतर आजार नव्हता.
१ जानेवारी ते ३० ऑक्टोबर दरम्यान राज्यात स्वाइन फ्लूमुळे ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात ५७ टक्के रुग्ण शहरी भागातले, तर ४२ टक्के रुग्ण ग्रामीण भागातले होते. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले,‘आजाराचा प्रसार कसा होतो त्यानुसार तो कोणत्या भागात अधिक पसरेल हे ठरते. स्वाइन फ्लू हवेवाटे आणि जिथे लोकसंख्येची घनता अधिक आहे तिथे वेगाने पसरु शकतो. तुलनेने ग्रामीण भागात लोकसंख्या विरळ असल्याने तिथे स्वाइन फ्लू अधिक सापडत नाही. परंतु शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे विविध आजारांच्या बाबतीत शहरी व ग्रामीण असा ठळक फरक दिसत नसून हेच स्वाइन फ्लूमध्येही आढळत आहे. या वर्षी पुणे ग्रामीणमध्ये स्वाइन फ्लूच्या मृत्यूंची संख्या लक्षणीय होती. बारामती, इंदापूर, मंचर, चाकण हा ग्रामीण भाग मानला जात असला तरी प्रत्यक्षात तो शहरी भागासारखाच आहे.’
स्वाइन फ्लूच्या एकूण मृत्यूंपैकी ४५९ रुग्णांना काही ना काही इतर आजार होते, तर ४०३ रुग्णांना इतर आजार नव्हते. इतर आजारांमध्येही उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण लक्षणीय राहिले. डॉ. आवटे म्हणाले,‘स्वाइन फ्लू झाल्यावर शरीराचा येणारा प्रतिसाद रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो, परंतु सरासरी साधारणपणे ५५ टक्के मृत्यूंमध्ये रुग्णाला इतर आजार असल्याचे आढळते.’
स्वाइन फ्लूच्या मृत्यूंपैकी इतर आजार/ विशिष्ट आरोग्य परिस्थिती असलेल्या रुग्णांची आकडेवारी अशी-
आजाराचे नाव        मृत्यू
उच्च रक्तदाब             १८९
मधुमेह                     १८५
दमा                           १०
गरोदर स्त्रिया              ४८
स्थूलता                      १२
याशिवाय इतर आजार     १८७
रहिवासानुसार मृत्यूंची आकडेवारी –
ग्रामीण भाग मृत्यू- ३६९
शहरी भाग मृत्यू-   ४९३