पुणे : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या बारामती येथील विमान अपघाताच्या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणात काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. विमान अपघात तपास ब्युरो या (एएआयबी) यंत्रणेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्ष हा तपासात महत्त्वाचा घटक राहणार आहे. त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल’, अशी माहिती ‘सीआयडी’चे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला शनिवारी (२८ फेब्रुवारी) एक महिना होत आहे. या प्रकरणामध्ये विविध मुद्दे उपस्थित करून आमदार रोहित पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणी दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. त्याची माहिती सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात माहिती देताना रामानंद म्हणाले, ‘अपघातामध्ये घातपात आहे का?, गुन्हेगारी कृत्य घडले आहे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स आहे का?, या दृष्टीने सीआयडीमार्फत तपास करण्यात येत आहे. या घटनेचा तपास योग्य पद्धतीने करण्यात येत आहे. बारामती वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन ऑथॉरिटी आणि केंद्रातील तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करीत आहेत. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) आणि सीआयडी यांच्यामध्ये समन्वय ठेवून तपास करण्यात येत आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे सीआयडी पुढील तपास करणार आहे.’
‘राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्याकडे सोपविण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. सीआयडीने या प्रकरणात बरेच पुरावे एकत्रित केले आहेत. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे’, असेही रामानंद यांनी सांगितले.
बारामती येथील विमान अपघाताच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे का? ब्लॅक बॉक्स जळाला आहे का? यांसह अन्य प्रश्नावर उत्तर देणे टाळताना या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून गतीने सुरू असल्याचे रामानंद यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, सीआयडी पुणे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सीआयडी मुंबई कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक प्रशांत वागुंडे उपस्थित होते.

