पुणे : ‘प्रश्न विचारायचे धाडस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आले. आपल्या समाजातील बायकांचा संघर्ष समाजासमोर आला पाहिजे, यासाठी लिखाण सुरू केले,’ अशा शब्दांत प्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘गेल्या काही वर्षात डाॅ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा कार्यकर्त्यांचे खून झाले, ही मन विषण्ण करणारी बाब आहे. एकीकडे निराशाजनक परिस्थिती असताना आता ‘जेन-झी’ने केलेल्या जनआंदोलनातून आश्वासक चित्र उभे राहिले आहे. सत्याचा, समतेचा आवाज उठवत राहण्याची गरज आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ यांच्यावतीने ज्येष्ठ हिंदी लेखक-अनुवादक डाॅ. दामोदर खडसे यांच्या हस्ते उर्मिला पवार, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अशोक गोपाल आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काळेबेरे यांना ‘महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’चे संपादक अरुण खोरे, सल्लागार विजय जाधव या वेळी उपस्थित होते.
डॉ. खडसे म्हणाले, ‘देशभरातील दलित साहित्याच्या निर्मितीचे श्रेय हे मराठी भाषेला जाते. त्यानंतर देशभरातील विविध भागातून दलित साहित्य लिहिले गेले. दलित साहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या दया पवार यांच्या ‘बलुतं’ कादंबरीच्या संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे. त्यानंतर दलित साहित्यात, फुले आणि आंबेडकर यांच्या कार्यावरही मोठ्या प्रमाणात लिखाण झाले. पण आजच्या घडीला लिखाणातून समाजात खरेच परिवर्तन झाले का हा प्रश्न कायम आहे. हे परिवर्तन झाले नसेल, तर आपल्याला अजूनही काम करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते.’
पाटील म्हणाले, ‘शिक्षणाच्या बळावर महिला सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. त्यांच्या या प्रगतीचा पाया महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी घातला, याचे भान समाजाने ठेवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले महान गुरू मानले होते. सामाजिक समता, शिक्षण आणि मानवमुक्तीसाठी फुले-आंबेडकरांनी केलेले कार्य आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करून सामाजिक समतेचा हा विचार पुढे नेणे ही काळाची गरज आहे, खोरे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जाधव यांनी आभार मानले.
