पुणे :  ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या रणजितसिंह डिसले या सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची अमेरिकन सरकारच्या प्रतिष्ठेच्या फुलब्राइट पाठय़वृत्तीसाठी निवड झाली आहे. पीस इन एज्युकेशन या विषयावर अभ्यास करण्यासाठी डिसले यांची या पाठय़वृत्तीसाठी निवड झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून डिसले कार्यरत आहेत. शालेय पाठय़पुस्तकांमध्ये क्युआर कोड समाविष्ट करण्याच्या अभिनव कल्पनेसाठी डिसले यांना गेल्यावर्षी युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्यातर्फे ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. सात कोटी रुपये पुरस्कार रक्कम असलेल्या त्या पुरस्कारासाठी डिसले यांच्यासारख्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. अलीकडेच डिसले यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदीही निवड झाली. त्यानंतर आता त्यांना २०२१-२२ साठीच्या फुलब्राइट पाठय़वृत्तीसाठी निवड झाली आहे.

फुलब्राइट पाठय़वृत्तीसाठी निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून डिसले म्हणाले, की शिक्षणाच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश देण्यासाठी लेट्स क्रॉस इन बॉर्डर हा प्रकल्प गेली काही वर्षे राबवत आहे. त्यात पीस इन एज्युकेशन या विषयावर अधिक अभ्यास करण्यासाठी ही पाठय़वृत्ती मिळाली आहे. या पाठय़वृत्तीअंतर्गत अमेरिकेतील विद्यापीठात चार महिने अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यापीठ कोणते ते जानेवारीमध्ये कळणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता आहे, जिल्हा परिषद शिक्षकांनाही फुलब्राईट पाठय़वृत्ती मिळू शकते हे माझ्यारुपाने अधोरेखित झाले आहे. यातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळू शकेल, अशी भावना डिसले यांनी व्यक्त केली.