पुण्यातील काँग्रेस पक्षाचा सुवर्ण काळ आणि पडता काळ पाहणारे काँग्रेस भवन येथील कार्यालयीन सचिव उत्तम भुमकर यांना आज काँग्रेस भवन येथे हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. ज्या काँग्रेस भवनाची ४० वर्ष सेवा केली, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उद्या ८३ व्या वर्षात पदार्पण करणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी उत्तम भुमकर हे करत होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यावर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.