पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील विविध भागात महत्वाच्या राजकीय नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले आहे. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी हे मोठे नेते तर महाविकास आघाडीकडून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे विविध मतदार संघात सभा घेणार आहेत.
राज्याच्या विधिमंडळात बहुजन समाज पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी या निवडणुकीत बसप ने उमेदवार उतरविले आहेत. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील बसप चे उमेदवार, आणि पक्षाचे प्रदेश महासचिव हुलगेश चलवादी यांच्या प्रचारासाठी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांंची जाहीर सभा होणार आहे. येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय मैदानावर १७ नोव्हेंबरला ही सभा होणार आहे. या सभेची तयारी कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून जोरदार केली जात आहे.
हेही वाचा >>> कसब्या’ची ९८ वर्षांपूर्वीची बिनविरोध निवडणूक…
बहुजन समाज पक्षाने तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा राजकीय प्रतिनिधी बसपाच्या माध्यमातून पाठवण्याची तयारी पक्षाने केली आहे. समाजातील शोषित, पीडित, उपेक्षितांना नेतृत्व देवून त्यांना शासनकर्ती जमात करण्याचे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बसप नेते कांशीराम आयुष्यभर झटले. त्याच उपेक्षित समाजाला पुढे नेण्यासाठी बसप मैदानात उतरले असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाला बसपने पाठिंंबा दिला आहे. चलवादी यांनी नुकतीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन मायावती यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या वेळी बसपचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, स्वप्नील शिर्के उपस्थित होते.