पिंपरी : भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका तरुणाला अटक केली आहे. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चाकण येथील ठाकरवस्ती चौक येथे ही घटना घडली.

असिफ शेख (वय २९, चाकण. मूळ रा. दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बीएनएस कलम १९६, राष्ट्रीय सन्मान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनीश सीताराम राजभर (वय ३१, नाणेकरवाडी, खेड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजभर यांचे चाकण मधील ठाकरवस्ती परिसरात भाजीविक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाजवळ चिकनच्या दुकानात आरोपी असिफ एक वर्षापूर्वी काम करत होता. दरम्यान त्याने काम सोडले होते. १६ एप्रिल रोजी तो मद्याच्या नशेत राजभर यांच्या दुकानाजवळ आला. त्याने सोबत भारताचा राष्ट्रध्वज आणला होता. त्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केला. हा प्रकार राजभर यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी असिफ याला अटक केली आहे. दक्षिण चाकण पोलीस तपास करीत आहेत.