वस्तू पुनर्वापरासाठी ‘स्वच्छ’चा उपक्रम

महापालिकेच्या सहकार्याने स्वच्छ संस्था गेल्या अकरा वर्षांपासून व्ही-कलेक्ट हा उपक्रम राबवित आहे.

पुणे : दिवाळीनिमित्त घरोघरी होणाऱ्या साफसफाईला शहरव्यापी स्वरूप देत स्वच्छ संस्थेने ‘व्ही कलेक्ट’ या उपक्रमाअंतर्गत महिनाभरात तब्बल ८२ टन जुन्या वस्तू भू-भरावात जाण्यासापासून रोखल्या आहेत. या सर्व वस्तू पुनर्वापरासाठी पाठविण्यात आल्या असून यामध्ये ४० टन जुने कपडे, १५ टन ई-वेस्ट आणि २७ टन अन्य वस्तूंचा समावेश आहे.

महापालिकेच्या सहकार्याने स्वच्छ संस्था गेल्या अकरा वर्षांपासून व्ही-कलेक्ट हा उपक्रम राबवित आहे. दिवाळीची साफसफाई करणे नागरिकांना अधिक सोईचे व्हावे, यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शहरात फिरती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध भागात २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये जुन्या वस्तूंचे संकलन करण्यात आले. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात दर शनिवारी आणि रविवारी सोसायटी आणि रहिवासी गृहप्रकल्पांमध्ये स्वच्छ संस्थेने कचरा संकलन मोहीम हाती घेतली. या मोहिमेतून ८२ टन वस्तू संकलन करून त्या पुनर्वापरासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

‘कमी वापर, पुनर्वापर आणि पुन:चक्रीकरण’ या त्रिसूत्रीनुसार ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला प्रतिसाद देत नागरिकही शहराचे पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन बळकट करण्यासाठी सक्रियपणे सहभागी होत असल्याचे दिसून आले,’ असे स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ३० टन वस्तूंचे संकलन व्ही कलेक्ट या उपक्रमात नागरिकांचा सहभाग दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षी या मोहिमेअंतर्गत ३० टन जुन्या वस्तूंचे संकलन करण्यात आले होते. संकलित केलेल्या वस्तू कचरा वेचक आणि अन्य गरजूंना अतिशय अल्प दरात दिल्या जाणार असून त्यातून येणारे उत्पन्न कचरा वेचकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जाणार आहे. मोठय़ा प्रमाणावर कचरा संकलन झाल्याने यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक ठरली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: V collect venture by swach organization in collaboration with the pmc zws