पुणे : वडगाव खुर्द परिसरातील रेडी मिक्स क्राँक्रिट (आरएमसी) प्रकल्पचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे या भागात प्रदूषण आणि अपघातांची मालिका सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना धोकादायक ठरणारे हे प्रकल्प या परिसरातून तातडीने स्थलांतरीत करावेत, अशी मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे खासदार कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. कुलकर्णी यांनी नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील वडगाव खुर्द दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजा सिटी, मधुकोष सोसायटी, धायरी लेन परिसरातील बेकायदा उभारण्यात आलेल्या आरएमडी प्रकल्पांची पाहणी केली. प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. या प्रकल्पांमधून होणारे प्रदूषण, या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अशा अनेक गोष्टी लक्षात आल्यानंतर खासदार कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
महापौर आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी याबाबत तातडीने कारवाई करून हे बेकायदा आरएमसी प्रकल्प बंद करावेत आणि त्यांचे स्थलांतर दुसरीकडे करावे, अशी मागणी त्यांनी केली. बेकायदा सिमेंट क्राँक्रिट प्रकल्पांमुळे या परिसरात अतिघातक प्रदूषण होत असून, सिमेंटची भुकटी या भागातील रहिवाशांच्या घरात येत आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचा त्रास होतो, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात आली. हे प्रकल्प या परिसरातून इतर ठिकाणी हलवावे, यासाठी वारंवार महापालिकेला निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशांनी खासदार कुलकर्णी यांच्याकडे दाद मागितली आहे.
यावेळी प्रयेजा पुरम सोसायटीचे अध्यक्ष गणेश पिंपळे, सचिव प्रितेश चांडगे, पवन मोकाशी, संतोष कुलकर्णी, राजेंद्र पाटील, शर्मिला नाखारे, नीलेश घोडके, शेखर लोहोटे, प्रशांत गोहाड, मनीष वैद्य, गिरीश चोरघे, स्वाती टिळक, मंगला ठाकरे, नंदिनी कुलकर्णी, हरिहर घोडके, वासुदेव गोहाड आदी उपस्थित होते.
उंड्री, औताडेवाडी, हांडेवाडी येथे महापालिकेची कारवाई
पुणे महापालिकेच्या वतीने उंड्री, औताडेवाडी, हांडेवाडी येथील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या सात आर एम सी प्रकल्पांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. बांधकाम विभागाच्या झोन एक च्या पथकाने ही कारवाई केली. अधिक्षक अभियंता प्रवीण शिंदे कार्यकारी अभियंता सुरेश साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे, राहुल सोरटे यांनी ही कारवाई केली.
