पिंपरी : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीची निवडणूक महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने स्वबळावर, तर भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षाने युतीमधून लढण्याचे निश्चित केले आहे. दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मांदियाळी असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी रोखण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर असणार आहे. मनसेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असून, तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक सन २०१८ मध्ये झाली होती. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे भास्करराव म्हाळसकर, वडगाव-कातवी नगरविकास समितीचे मयूर ढोरे आणि अपक्ष पंढरीनाथ ढोरे अशी तिरंगी व चुरशीची निवडणूक झाली होती. त्यात मयूर ढोरे यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भारतीय जनता पार्टीचे सात, दोन अपक्ष व एक मनसे असे पक्षीय बलाबल होते. सुरुवातीला राष्ट्रवादीचा एक गट आणि भाजप अशी सत्ता होती. सन २०१९ मध्ये सुनील शेळके तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर नगरपंचायतमधील सत्तेतही बदल झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली.
दरम्यान, पहिले नगराध्यक्ष मयूर ढोरे आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आहेत. वडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजपची ताकद आहे. मनसेचेही एका प्रभागात वर्चस्व आहे. वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी चार, नगरसेवकपदासाठी ५० आणि भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवकपदासाठी ५० जणांनी अर्ज नेले आहेत. भाजपकडून मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची कन्या ॲड. मृणाल म्हाळसकर नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीसाठी प्रबळ इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची पत्नी अबोली ढोरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मनसेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) भाजप-शिवसेना (शिंदे) आणि मनसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सत्ता कायम राखण्याचे आमदारांसमोर आव्हान
भाजपने ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर यांची प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आमदार सुनील शेळके यांच्याकडे आहे. आमदार शेळके यांच्यासमोर नगरपंचायतीमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.
प्रभाग १७, नगरसेवक १७
नगरपंचायत निवडणुकीत १७ प्रभाग असून १७ नगरसेवक आहेत. एकूण १९ हजार ८४७ मतदार आहेत. त्यात पुरुष दहा हजार १८४ आणि महिला नऊ हजार ६६३ मतदार आहेत.
