पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या मतदारसंघात कोणताही आमदार सलग दोन वेळा निवडून येत नाही, हा इतिहास आहे. येथील मतदार प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देतात. त्यामुळे यंदा या मतदारसंघातील मतदार आमदार निवडण्याची परंपरा खंडित करणार, की या मतदारसंघाचा इतिहास बदलणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांच्या महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील टिंगरे येथील विद्यमान आमदार आहेत. महायुतीत झालेल्या जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेनुसार या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा संबधित पक्षाला असे ठरले आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात गाठीभेटी घेऊन निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी मुळीक यांनी केली आहे. या मतदारसंघातून भाजपलाच उमेदवारी मिळणार असा दावा ते करतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>पुण्यातील भारत-न्यूझीलंड कसोटी सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांची पाण्यासाठी वणवण…

वडगाव शेरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून या मतदारसंघात कोणत्याच पक्षाचा एकच आमदार सलग दोनदा निवडून येत नाही. येथील मतदार प्रत्येक वेळी नवीन व्यक्तीला संधी देतात. या मतदारसंघातून आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षांचे आमदार झाले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्याही एकाच पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही.

सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बापू पठारे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपने या मतदार संघातून जगदीश मुळीक यांना उमेदवारी दिली. मोदी लाटेत मुळीक येथून विजयी झाले. २०१९ मध्ये भाजपने या मतदारसंघातून पुन्हा मुळीक यांना उमेदवारी दिली होती. मात्र, वडगाव शेरीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांच्या पारड्यात मतांचे विजयाचे दान टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करत येथून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. आपल्याला अथवा आपला मुलगा सुरेंद्र पठारे याला उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा >>>२४ तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल; चंद्रकांत पाटील

कल्याणीनगर भागात काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात आमदार टिंगरे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे त्यांच्याबाबत मतदारांमध्ये रोष असल्याने त्यांना उमेदवारी न देता ही जागा भाजपने आपल्याकडे घ्यावी, अशी मागणी महायुतीत सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ लढत?

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत आमदार टिंगरे यांचे नाव नाही. मात्र, त्यांना पक्षाने थेट ‘एबी फॉर्म’ दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातच लढत होण्याचे संकेत आहेत. शरद पवार हे माजी आमदार बापू पठारे की त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे लक्ष लागले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक नेमकी काय भूमिका घेतात, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.