पुणे : न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या (UNCSW) वार्षिक परिषदेसाठी पुण्यातील वैद्य ईशानी बेंडाळे यांची निवड झाली आहे. या परिषदेत सलग तिसऱ्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करणार असून, आरोग्य व्यवस्थेतील प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे महिलांचे आरोग्य, न्यायप्रवेश आणि समानतेशी संबंधित मुद्दे मांडणार असल्याची माहिती ईशानी बेंडाळे यांनी दिली.

महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाची वार्षिक परिषद यंदा (UNCSW) ९ ते १९ मार्च दरम्यान न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणार आहे. जगभरातील विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि नागरी संस्था या परिषदेत सहभागी होणार आहेत.

वैद्य बेंडाळे या मूळच्या पुण्यातील असून, त्यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेद वैद्यकशास्त्रातील पदवी (बीएएमएस) पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील स्वानसी विद्यापीठातून नॅनोमेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या त्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा’ या विषयात उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत २०२३ मध्ये त्यांची ब्रिटिश सोसायटी फॉर नॅनोमेडिसिन संस्थेच्या ‘चॅम्पियन’ म्हणून निवड झाली. मागील वर्षी त्यांनी ऑक्सफर्ड युनियन या प्रतिष्ठित संस्थेत ‘पाश्चिमात्य स्त्रीवाद आणि ग्लोबल साऊथ’ या विषयावरील चर्चासत्राचे संचालन केले होते.

या परिषदेतील सहभागाबद्दल बोलताना ईशानी बेंडाळे म्हणाल्या,‘संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या वार्षिक परिषदेत तिसऱ्यांदा सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा मला मोठा सन्मान वाटतो. भारतातील वैद्य किंवा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आरोग्य क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवातून महिलांच्या आरोग्य, न्यायप्रवेश आणि समानतेशी संबंधित मुद्दे मांडण्याची संधी मिळत आहे. जागतिक स्तरावर स्त्री-पुरुष समानतेबाबत व्यापक संवाद घडवून आणणे आवश्यक आहे. धोरण, प्रत्यक्ष अनुभव आणि जागतिक सहकार्य यांना जोडणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची मी उत्सुक आहे.’

ईशानी बेंडाळे यांच्याविषयी

शिक्षण : पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी, ब्रिटनच्या स्वानसी विद्यापीठातून नॅनोमेडिसिनमध्ये पदव्युत्तर आणि सध्या ऑक्सफर्डमध्ये संशोधन.

निवड : सलग तिसऱ्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महिला आयोगाच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व.

विषय : महिलांचे आरोग्य, न्यायप्रवेश आणि समानतेशी संबंधित प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मुद्दे.

सन्मान : २०२३ मध्ये ब्रिटिश सोसायटी फॉर नॅनोमेडिसिनच्या ‘चॅम्पियन’ म्हणून गौरव.

संयुक्त राष्ट्रांचा महिला आयोग काय काम करतो ?

संयुक्त राष्ट्रांचा महिला आयोग (Commission on the Status of Women – CSW) ही लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहे. हा आयोग महिलांच्या हक्कांसाठी धोरण निर्मिती, जागतिक मानके निश्चित करणे आणि जगभरातील महिलांच्या स्थितीचे अभ्यास करून सुधारणा सुचवण्याचे काम करतो. CSW ची स्थापना १९४६ मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) अंतर्गत हा आयोग काम करतो.

महिला आयोगाची प्रमुख कामे :

जागतिक धोरण निर्मिती : महिलांच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय धोरणे आणि मानके तयार करणे.

प्रगतीचे मूल्यांकन : विविध देशांमध्ये लैंगिक समानतेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीचा आढावा घेणे आणि आव्हाने ओळखणे.

शिक्षण आणि सक्षमीकरण : महिलांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हक्कांना चालना देणे.

भेदभाव निर्मूलन : महिलांवरील हिंसाचार, भेदभाव, अन्यायाविरुद्ध कायदे आणि धोरण तयार करणे.

दरवर्षी बैठक : न्यूयॉर्कमधील UN मुख्यालयात दरवर्षी दोन आठवड्यांचे सत्र आयोजित करून जगभरातील महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येते.