वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनीमध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या स्क्रबरचा मोठा आवाज होत आहे. या आवाजाच्या त्रासामुळे रात्रीच्या वेळी झोपणे मुश्कील झाले असल्याची व्यथा परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मांडली आहे. तर, या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार एका मान्यवराने केली आहे.
वैकुंठ स्मशानभूमी येथील एक विद्युतदाहिनी वार्षिक दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी गेल्या महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. हे काम करताना दाहिनीमध्ये असलेल्या फिल्टरचा स्क्रबर बदलण्यात आला. शवाचे दहन होत असताना निघणारा धूर हा फिल्टरमधील पाण्यातून गाळून चिमणीच्या माध्यमातून बाहेर सोडला जातो. त्यामुळे या धुराला काजळी नसते. दुरुस्तीदरम्यान या फिल्टरमधील आधीचा स्क्रबर बदलण्यात आला असून त्याच्याजागी नवा स्क्रबर बसविण्यात आला आहे. गेल्या तीनचार दिवसांपासून ही विद्युतदाहिनी कार्यरत झाली आहे. मात्र, या नव्या स्क्रबरचा आवाज मोठय़ा प्रमाणावर येत असून त्यामुळे रात्री शांतपणे झोप घेणे अवघड झाले असल्याची या परिसरातील नागरिकांची व्यथा आहे. रात्री आजूबाजूला शांतता असताना होणाऱ्या या मोठय़ा आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार या भागातील एका मान्यवराने महापालिकेकडे केली आहे. ही व्यक्ती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे.
रात्रपाळीमध्ये बांबू न कापण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश
वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील या मान्यवराने केलेल्या तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने रात्रपाळीमध्ये बांबू न कापण्याचे आदेश दिले आहेत. विद्युतदाहिनीतील असिस्टंट इलेक्ट्रिशियन आणि सर्व बिगारी सेवक यांनी रात्रपाळीमध्ये ताटीसाठी लागणारे बांबू दुपारपाळीमध्ये कापून ठेवावेत. बांबू कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनचा परिसरातील नागरिकांना त्रास होता कामा नये याची खबरदारी घ्यावी, असा आदेश टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधीक्षकाने काढला आहे. विद्युतदाहिनीमध्ये पार्थिव आत ठेवताना वेगळ्या प्रकारची ताटी वापरली जाते. पार्थिवाच्या वजनानुसार ही ताटी तयार केली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव येऊ नये, अशी प्रार्थना आम्ही करतो, असे स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले.