महापालिका प्रशासनाचे आज मी विशेष अभिनंदन करणार आहे. कारण ओला-सुका कचरा वेगळा करून टाकण्यासाठी आमच्या नागरिकांना बादल्या द्या म्हणून आम्ही सर्व नगरसेवक सातत्याने मागणी करत असतो. आमची मागणी तुम्ही मान्य करत नाही; पण महापालिकेच्या या बादल्या चक्क पोर्ट ब्लेअरमध्ये विकल्या जात होत्या.. माजी महापौर वैशाली बनकर यांनी मंगळवारी खास सभेत हा मुद्दा मांडला आणि सारी सभा अवाक झाली.
पर्यावरण अहवालावरील खास सभेत बोलताना बनकर यांनी त्या महापौर असतानाचा त्यांचा हा अनुभव कथन केला. त्या म्हणाल्या, की आमच्या ओळखीचे एक अधिकारी अंदमान-निकोबारला गेले होते. तेथील एका दुकानात पुणे महापालिका ज्या बादल्या कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांना देते, त्या बादल्या विक्रीसाठी ठेवलेल्या त्यांना दिसल्या. शंभर रुपयाला एक या प्रमाणे पुणे महापालिकेच्या बादल्यांची विक्री तेथे होत होती. त्यांनी त्याचे छायाचित्र काढून ते मला ई मेलवर पाठवले. हा प्रकार मी तातडीने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आयुक्त माझ्या तक्रारीची दखल घेऊन स्वत:हून काहीतरी कृती करतील, त्याबाबत मला कळवतील अशी माझी अपेक्षा होती.
प्रत्यक्षात दहा दिवस होऊनही आयुक्तांनी मला त्याबाबत काहीही कळवले नाही. म्हणून मी पुन्हा त्या अधिकाऱ्यांना ज्या दुकानात त्या बादल्यांची विक्री सुरू होती, त्या दुकानाचे छायाचित्र पाठवायला सांगितले. त्यानंतर ते पुन्हा त्या दुकानात गेले, तर सगळ्या बादल्या गायब झालेल्या होत्या, असे सांगून बनकर म्हणाल्या, की आम्ही सातत्याने आमच्या नागरिकांसाठी ज्या बादल्या मागत असतो, ज्यासाठी भांडत असतो त्या बादल्या पुणेकरांना मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. माजी महापौरांचा हा अनुभव ऐकून सारे सदस्य चकित झाले होते.