पुणे : वैशाली हॉटेलच्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करुन सदनिकेवर पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या मालकिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे: विसर्जन मिरवणुकीत दणदणाट भोवला…आठ गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे




याबाबत निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विश्वजीत विनायक जाधव (वय ४१) यांच्यासह कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवि परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन वाद सुरू आहेत. याबाबत दोघांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. निकिता यांना विश्वासात न घेता पती विश्वजीत यांनी बँक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निकिता यांची बनावट स्वाक्षरी करुन बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. निकिता यांच्या परवानगीशिवाय सदनिका बँकेकडे तारण ठेवून चार कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे निकिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. निकिता यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.