पिंपरी : ‘वैष्णवीला ज्या दिवशी मारहाण करण्यात आली, त्याच दिवशी तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून दिसून येत आहे. त्यामुळे वैष्णवीची संगनमताने कट रचून हत्या केली आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात यावे,’ अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मंगळवारी केली.

वैष्णवी हगवणे हिला तिने आत्महत्या केली, त्या दिवशीही मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. तिच्या मृतदेहावर एकूण २९ जखमा आढळल्या. त्यातील १५ जखमा या तिच्या मृत्यूपूर्वीच्या २४ तासांमधील असल्याचे बावधन पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे म्हणाले, ‘शवविच्छेदन अहवालावरून ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वैष्णवीची संगनमताने कट रचून हत्या केली आहे. तिच्या शरीरावर एका दिवसात १५ जखमा आहेत. तसेच, यापूर्वीच्या इतर जखमाही शरीरावर दिसून येत आहेत. यावरून तिला यापूर्वीही सतत छळ, मारहाण होत होती, हे सिद्ध होत आहे. पाईपने, गजाने तिला मारहाण करून, छळ करून तिची हत्या केली आहे, असे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात यावे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या खटल्यासाठी राजेश कवाडिया या सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी भेटायला आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांकडे केली आहे. शासनाने याबाबत काय निर्णय घेतला आहे का, याची मला कल्पना नाही. पोलिसांनी जी कलमे लावली आहेत, त्यात कोणती वाढ करणार आहेत का, सद्यस्थितीत तपास काय सुरू आहे, याची मला पुसटशीही कल्पना नाही. पोलीस त्याची माहिती देत नाहीत. नीलेश चव्हाण मोकाट फिरत असताना त्याची माहिती का मिळू शकत नाही? त्याला त्वरित अटक करावी,’ असेही कस्पटे म्हणाले.