Vaishnavi Hagawane Death : पुण्यातल्या मुळशी या ठिकाणी राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या तरुणीने आयुष्य संपवलं. १६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. वैष्णवीचे मामा यांनी हगवणे कुटुंबासह जी बैठक झाली त्यात कसा वाद झाला होता? आणि नंतर वैष्णवीने आपण लग्न करुन चूक केली हे कसं सांगितलं होतं ते आता स्पष्ट केलं आहे.
१६ मेच्या दिवशी वैष्णवीची आत्महत्या
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह
वैष्णवी आणि शशांक हगवणे या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र सुरुवातीला वैष्णवीच्या वडिलांनी या लग्नाला विरोध दर्शवला. मात्र वैष्णवीने हट्ट सोडला नाही. तिला शशांकशीच लग्न करायचं होतं. त्यानंतर तिचे वडील रुग्णालयातल्या अति दक्षता विभागात होते. त्यावेळी तिने शशांकसह पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ही बाब तिच्या मामाला कळली तेव्हा त्याने तिची समजूत घातली. टाइम्स नाऊ मराठीशी बोलताना वैष्णवीच्या मामाने ही माहिती दिली. तसंच लग्नाची बैठक आणि त्यात झालेला वाद काय होता? हे पण सांगितलं.
वैष्णवीच्या मामाने काय सांगितलं?
वैष्णवीचे मामा म्हणाले, “आम्ही तिच्या वडिलांची समजूत घातल्यावर वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह थाटात लावून देण्यात आला. ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी असं सगळं आम्ही दिलं होतं. मात्र हगवणे कुटुंबाची हाव काही संपली नाही. त्यांनी हुंडा, पैसे यासाठी वैष्णवीला मारहाण केली. तिचा छळ हुंड्यासाठीच केला जात होता असं वैष्णवीच्या मामाने म्हटलं आहे. तसंच बैठकीच्या वेळी झालेला वादही वैष्णवीच्या मामाने सांगितला. बैठकीच्या वेळी जेव्हा मागण्या होऊ लागल्या तेव्हा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे म्हणाले मला तुम्हाला मुलगी द्यायची नाही. तरीही हगवणे कुटुंबाने भांडून मोठी गाडी घेतली. त्यांच्यासाठी आम्ही MG हेक्टर गाडी बुक केली होती. ती गाडी रद्द करा आणि फॉर्च्युनर द्या अशी मागणी केली. सोन्याची मागणीही अशीच वादातूनच झाली. १ लाख २० हजारांचं घड्याळही हगवणे कुटुंबाने मागून घेतलं. सहा महिन्यांनी अशाच गोष्टी समोर येऊ लागल्या. वैष्णवीला मी विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यावर ती मला म्हणाली मामा माझी चूक झाली. अर्थातच वैष्णवीला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होत होता” असं तिच्या मामाने सांगितलं.
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा हगवणे अटकेत आहेत.