पिंपरी- चिंचवड: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अवघ्या महाराष्ट्राला माहीत झाले आहे. सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. वैष्णवीचा प्रेम विवाह होता. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी इतर मुलींना प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुलींनी प्रेमात पडू नये, अशी त्यांनी कळकळीची विनंती केली आहे. अनिल कस्पटे हे पत्रकारांशी बोलत होते.
अनिल कस्पटे यांनी तरुणींना एक कळकळीची विनंती केली आहे. ते म्हणाले, मुलींना माझं एक सांगणं आहे. प्रेमात पडताना विचार करून प्रेम करा. समोरच्या व्यक्तीची माहिती काढा. पार्श्वभूमी तपासा, त्याची परिस्थिती काय आहे, वागणूक आणि बोलणं कसं आहे, ते बघा. कुणी तुम्हाला भुरळ घालू नये. अन्यथा माझ्या मुलीसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडू नये. मुलींना एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही प्रेमात पडू नका. आई वडिलांचा विचारा, सल्ला घेऊन लग्न करा. आई- वडील म्हणतील त्यांच्याशी लग्न करा, असं अनिल कस्पटे यांनी आवाहन केलं आहे.
वैष्णवीचा झाला होता प्रेमविवाह…
वैष्णवीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्यात आलं आहे. गुन्ह्यात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पहाटे स्वारगेट भागातून अटक करण्यात आली. वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. या प्रेमविवाहाला आधी अनिल कस्पटे यांचा विरोध होता. वैष्णवीसाठी मुलांची स्थळं आणण्यात आली होती. पण, शशांक त्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगायचा. अखेर अनिल कस्पटे आणि कुटुंबाने वैष्णवीचा विवाह शशांक सोबत लावून देण्याचे ठरवले होते. २८ एप्रिल २०२३ रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा विवाह संपन्न झाला होता. ५१ तोळे सोन्याचे दागिने, साडेसात किलो चांदी, १ फॉर्च्युनर कार असा हुंडा देखील देण्यात आला. पण, काही महिन्यांतच प्रेमविवाह केलेल्या वैष्णवीला सासरचा जाच सुरू झाला. पती शशांक वैष्णवीला मारहाण करायचा. अखेर या जाचाला कंटाळून १६ मे रोजी सायंकाळी टोकाचं पाऊल उचलत वैष्णवीने आत्महत्या केली.