पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीबरोबर युती झाली आहे, अशा समाजमाध्यमात अखेरपर्यंत खोट्या बातम्या पसरवून आमचा घात केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ज्याठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी एकत्रित उमेदवार उभे केले आहेत, अशाच ठिकाणांवर वंचित बहुजन आघाडीचे ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत तायडे बोलत होते. बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य युवा आघाडीचे विशाल गवळी आणि शहर सचिव बी. पी. सावळे उपस्थित होते.

तायडे म्हणाले, ‘महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका पार पडल्या. दोन्ही बैठकीत काँग्रेस आणि शिवसेना पक्षांसोबत उमेदवारीसंदर्भात साधक-बाधक चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ४० जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता.

तसेच ज्या ठिकाणी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे) या दोन्हीं पक्षांना उमेदवार देता येणे शक्य नाही किंवा जागांबाबत साशंकता आहे तेथे आमचे उमेदवार देण्यात येईल असेही सुचविण्यात आले. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष यांनीही वंचित बहुजन आघाडीसोबत आमची युती असणार आहे, अशा समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाकडून शेवटपर्यंत चर्चा सुरू ठेवून अखेरच्या क्षणापर्यंत कुठलीही ठोस भूमिका न घेता एकही जागा देऊ केली नाही. याउलट समाजमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पेरल्या.’

काँग्रेस पक्षासोबत ज्या पक्षांच्या अजेंड्याविरोधात लढा देत आहेत, त्याच पक्षासोबत काँग्रेसने अनेक ठिकाणी युती केली आहे. ही जनतेची फसवणूक असून राजकीयदृष्ट्या मोठी शोकांतिका आहे, अशी खंत व्यक्त करत काँग्रेसने हेतुपुरस्सर आणि जातीय मानसिकतेतून वंचित बहुजन आघाडीसोबत युती तोडली असल्याची टीका तायडे यांनी केली.

सुप्रिया सुळेबरोबरही चर्चा

महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पक्ष सोडून कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार असल्याचे अगोदरच ठरले होते. त्यामुळे आमची राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाबरोबर युती करण्याची तयारी होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबोबत युतीबाबत चर्चा झाली होती, असे तायडे यांनी सांगितले. मात्र, याबाबत कुठलीच सखोल माहिती देण्यात आली नाही.