वादातून टोळक्याने दुकानदारावर शस्त्राने वार करुन दहशत माजविल्याची घटना पाषाण भागात घडली. टोळक्याने झेरॅाक्स दुकानातील यंत्र, संगणक तसेच साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी बारा ते तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत संदीप विलासराव तुपे (वय ४०, रा. सूस रस्ता, बालाजी चौक, पाषाण ) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राज मानवतकर (वय २०), किशोर गोपी मेघावत (वय २०), नितीन उर्फ बया मेघावत (वय २०), नितीन वैद्य (वय २५, रा. सर्व रा. लमाण तांडा, पाषाण) यांच्यासह सहा ते आठ जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्य सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी सौरभ राव यांच्याकडे ?

पाषाण-सूस रस्त्यावर तुपे यांचे रॅायल कॅापीअर्स दुकान आहे. आरोपींशी तुपे यांचा वाद झाला होता. मानवतकर आणि साथीदार तुपे यांच्या दुकानात आले. तुपे यांना मारहाण केली. तुपे यांच्या दुकानातील यंत्र, संगणक तसेच अन्य साहित्याची आरोपींनी तोडफोड केली. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करत आहेत.